अमरावती: राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींमधून येऊ लागला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यादरम्यान शिंदे गटात प्रवेश करताच बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. दरम्यान, बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक आमदार रवी राणा यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. सोबतच एक गौप्यस्फोट देखील केला.
गौप्यस्फोट काय?
रवी राणा म्हणाले, काही दिवसांपुर्वी माझे शिवसेना नेते आशीष जयस्वाल, संजय राठोड यांच्यासोबत बोलणे झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मला सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेत आले पाहिजे. पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे. राजकारणात आहे तोपर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निष्ठेने राहील.
रवी राणांनी दिल्या शुभेच्छा
रवी राणा यांनी बच्चू कडू यांना आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना वाढीसाठी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी पक्षात घेतले, तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे माझ्या बच्चू कडू यांना शुभेच्छा आहेत. आता सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फोनवरून संपर्क साधला. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मला काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनीच बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशाविषयी मला माहिती दिली होती, असे रवी राणा म्हणाले.
राजकीय वैर कधीच कायम नसते
रवी राणा म्हणाले, शिवसेना वाढवण्यासाठी बच्चू कडू सारखा एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळाला आहे. राजकारणात कधीच टोकाची भूमिका नसते, लोकसभेमध्ये नवनीत राणांचा पराभव झाला, त्यामध्ये कोणाचा सिंहाचा वाटा होता ते जनतेला माहित आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा देखील हिशेब घेतला होता, त्यामुळे आता महायुती धर्म पाळून लोकसभा-विधानसभा एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे. मला बच्चू कडू यांना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फोन आला, त्यादिवशी मी त्यांना त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या निर्णयाबाबत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय वैर हे कधी कायम नसते.
