लोकसत्‍ता टीम

अमरावती : येत्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून महायुतीने प्रत्‍येक विभागात समन्‍वय बैठकांचे आयोजन केले आहे. मंगळवारी अमरावतीत पार पडलेल्‍या समन्‍वय बैठकीच्‍या बैठकीला युवा स्‍वाभिमान पक्षाचे अध्‍यक्ष व बडनेराचे आमदार रवी राणा यांना निमंत्रण नसल्‍याची माहिती समोर आली आहे. रवी राणांनी मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सोमवारी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे त्‍यांना निमंत्रित करण्‍याचे टाळल्‍याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्‍यात आले असले, तरी ते मुंबईत असल्‍याने बैठकीत उपस्थित नसल्‍याचे सांगण्‍यात आले.

येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक भवनात मंगळवारी अमरावती विभागाच्‍या महायुती समन्‍वय बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला पश्चिम विदर्भातील महायुतीच्‍या घटक पक्षातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव, राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे खासदार अनुप धोत्रे, भाजपचे आमदार प्रसाद लाड, योगेश टिळेकर, संजय कुटे, रणधीर सावरकर, प्रवीण पोटे, राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरे, संजय खोडके हे प्रामुख्‍याने उपस्थित होते.

आणखी वाचा-यवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत २४२ कोटींचा घोटाळा; कारवाई सुरू…

गेल्‍या काही दिवसांपासून थेट सरकारवर टीका करणारे आमदार बच्‍चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्‍यात आले, पण रवी राणांना या बैठकीपासून का दूर ठेवण्‍यात आल्‍याची चर्चा आता सुरू झाली आहे. महायुतीतील वरिष्‍ठ नेत्‍यांची नाराजी ओढवून घेतल्‍यामुळे रवी राणा यांना निमंत्रित करण्‍यात आले नसल्‍याचे बोलले जात आहे. यासंदर्भात रवी राणा यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता, त्‍यांच्‍याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

अमरावतीत काल मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात बोलताना रवी राणांनी वादग्रस्‍त वक्‍तव्य केले होते. आमचे सरकार पुन्‍हा सत्‍तेत आल्‍यास लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आम्‍ही दुप्‍पट म्‍हणजे ३ हजार रुपये करू, त्‍यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, मात्र ज्‍यांनी मला आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ म्‍हणून पंधराशे रुपये तुमच्‍या खात्‍यातून परत घेईन, असे रवी राणा म्‍हणाले होते, नंतर स्‍पष्‍टीकरण देताना त्‍यांनी आपण हे वक्‍तव्‍य गमतीने केल्‍याचे म्‍हटले होते.

आणखी वाचा-मुलाने घर हिसकावून घेतले, आता कुठे जाणार? वृद्ध महिला पोहचली थेट विभागीय आयुक्तांकडे

आमदार बच्‍चू कडू यांना समन्‍वय बैठकीचे निमंत्रण देण्‍यात आले, पण ते सध्‍या मुंबईत असून मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. बच्‍चू कडू यांनी काही दिवसांपुर्वी राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.