बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज १८ जूनला चौथा दिवस उजाडला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती,पीकविमा आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे.

साखरेच्या पातळीत घट

बुधवारी दोनदा करण्यात आलेल्या तपासणीत साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाल्याने अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आदी लक्षणे आहेत. पुढील काही तास अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले तर “हायपोग्लासोमिया” होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी अन्नत्याग मागे घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी दिले. प्रशासनाच्या वतीने बुलढाणा एसडीओ, तहसीलदार आणि ठाणेदार यांनी तुपकरांना आंदोलन मागे घेण्याची विंनंती केली. मात्र अन्नत्याग वर अटळ असल्याने तुपकरांनी आज चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले.

आंदोलनाची तीव्रता कायम

दुसरीकडे संतप्त कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या निषेध आंदोलनाचा जोर मात्र वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता करण्यात येणाऱ्या यां आंदोलनाकडे असलेले शासनाचे दुर्लक्ष कायम आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. याची धग थेट राजधानी मुंबई पर्यंत पोहोचली आहे.बुधवारी मध्यरात्री मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे प्रशासन हादरले आहे.

इतर जिल्ह्यातही आंदोलनाचा भडका

दरम्यान आंदोलनाचा वणवा इतर जिल्ह्यातही पसरल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसर गाठले. कर्जमाफीच्या आदेशाच्या प्रती आंदोलनकर्त्यांनी फाडून अरबी समुद्रात फेकल्या. त्यानंतर थेट समुद्रात उड्या घेत संताप व्यक्त केला.

कुलाबा पोलिसांनी समुद्रात उतरलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राज्य समन्वयक सचिन पांडुळे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सांगली संपर्क प्रमुख अजित गडदे, सतीश इढोळे, राहुल वानखेडे, कळमनुरी तालुकाध्यक्ष चैतन्य चव्हाण आणि रमेश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कुलाबा पोलीस ठाणे येथे नेण्यात आले.वाशिममध्ये अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांनी निदर्शने केली. महावितरण कार्यालयासमोर देखील आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे शेतकरी आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो गाडी पेटवून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.