बुलढाणा : भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री आणि संकटमोचक म्हणून परिचित असलेले नामदार गिरीश महाजन यांनी आज आणखी एक महत्त्वाची कामगिरी पार पाडली. मुख्यमंत्र्यांचे ‘दूत’ म्हणून बुलढाण्यात दाखल झालेल्या गिरीश महाजन आणि गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील चर्चा फलदायी ठरली. परिणामी, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, शुक्रवार (दि. १९ जून) रोजी दुपारी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले.
मुंबईत उच्चस्तरीय बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल आणि चर्चेतून सर्वमान्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही नामदार गिरीश महाजन यांनी उपस्थित पदाधिकारी व शेतकऱ्यांसमोर दिली.
येत्या चार ते पाच दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी व इतर खात्यांचे मंत्री, मुख्य सचिव तसेच विविध विभागांचे सचिव यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ही बैठक होणार असल्याचे महाजन यांनी जाहीर केले. महाजन आणि तुपकर यांच्यातील सकारात्मक चर्चा तसेच राज्य सरकार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेल्या ठोस आश्वासनांमुळे तुपकर यांनी ज्यूस घेऊन आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
काय म्हणाले महाजन?
यावेळी महाजन म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून त्यांच्या अडचणींची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत तुपकर यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा निघेल. तसेच शेतकऱ्यांना आणखी काय मदत देता येईल, शासन निर्णयांमध्ये आवश्यक ते बदल करता येतील का, याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.अल निनोमुळे राज्यासमोर मोठे संकट उभे ठाकले असल्याचे सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.
प्रकृती गंभीर
शेतकऱ्यांना सरसकट व विनाशर्त कर्जमाफी देण्याच्या मुख्य मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाणा-चिखली मार्गावरील आपल्या निवासस्थानी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही तुपकर यांनी आपला निर्धार कायम ठेवला होता. तिसऱ्या दिवसापासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी अन्नाचा एकही कण घेतला नसल्याने शरीरातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी झाली होती. अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आदी लक्षणे त्यांच्यात दिसून येत होती.
वैद्यकीय तज्ज्ञांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच राहिल्यास ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले होते. आज पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दरम्यान, आज शुक्रवारी नामदार गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह आंदोलनस्थळी उपस्थित असलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि समर्थक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
