बुलढाणा : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी आज, गुरुवारी मुंबईतील मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे बंगले आणि वाहनांचा प्रतिकात्मक लिलाव करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, कालपासून सुरू असलेली कार्यकर्त्यांची धरपकड आजही सुरूच आहे.

कार्यकर्त्यांचे अटकसत्र

मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्ह परिसरात आज सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही काही वेळापूर्वी अटक करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, रविकांत तुपकर अजूनही भूमिगत असून, ते मंत्रालय परिसरात कधी दाखल होतात, याकडे कार्यकर्त्यांसह मुंबई पोलिसांचे लक्ष लागले आहे.

झाडांनाही पोलिसांचा गराडा

या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा होण्याचे कारण ठरले आहे ते मंत्रालय परिसरातील झाडांनाही देण्यात आलेली पोलिस सुरक्षा. मागील आंदोलनावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या काही शिलेदारांनी मंत्रालय परिसरातील उंच झाडांवर चढून आंदोलन केले होते. आंदोलकांना झाडांवरून खाली उतरवताना मुंबई पोलिसांसह प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाली होती. यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. मंत्रालय परिसरातील झाडांभोवतीही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. आंदोलकांपासून मंत्र्यांचे बंगलेच नव्हे, तर झाडांचेही संरक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

मरीन ड्राईव्हवर सकाळपासून धरपकड

तुपकरांच्या आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या संभाव्य आंदोलकांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात आज सकाळपासून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संशयित हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांकडून नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची विचारपूस सुरू आहे. आंदोलकांना आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच रोखण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. टाले यांना अटक

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. आमदार निवास परिसरातून काही वेळापूर्वी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. एकीकडे मरीन ड्राईव्हवर कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना, दुसरीकडे आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनाच अटक झाल्याने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन किती सतर्क आहे, हे स्पष्ट होत आहे.

तुपकर अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असला, तरी रविकांत तुपकर नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. तुपकर आज सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरात आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा एवढा कडेकोट बंदोबस्त असताना तुपकर अचानक आंदोलनस्थळी प्रगटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.