बुलढाणा : विधानभवनात थेट घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांचा वर्षाव आणि सोयाबीन-कापूस उधळत सरकारविरोधात संतापाचा केलेला स्फोट,त्यानंतर रवीकांत तुपकर यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज गुरुवारी सकाळी विधानभवनात आंदोलन झाले. पण आंदोलन थांबले नाही. मंत्रालयासमोरील दोन उंच झाडांवर चार कार्यकर्त्यांनी गळ्यात फास अडकवून ठिय्या मांडला तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हवर काही शेतकरी थेट समुद्रात उतरले.
अखेर बैठकीचे निमंत्रण
मुंबईतील या अभूतपूर्व घडामोडींनी पोलीस आणि प्रशासनाची .तारांबळ उडाली.अखेर सलग चार तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकारला चर्चेची भूमिका घ्यावी लागली. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः रविकांत तुपकर यांना दूरध्वनी करून दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक निश्चित झाल्याची माहिती दिली.यामुळे मुंबईत सुरु करण्यात आंदोलन तुपकरांनी मागे घेतले.
विधानभवनात आंदोलन
आज सकाळपासूनच विधानभवन परिसर रणांगण बनला होता. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधानभवनावर धडकले. कडेकोट पोलीस बंदोबस्तालाही न जुमानता आंदोलनकर्त्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने भिरकावण्यात आल्या, तर सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारच्या आश्वासनांचा निषेध करण्यात आला. काही क्षणांतच संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला.यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. मात्र, तुपकर यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखी भडकले.
चार कार्यकर्त्यांचे झाडावर गळफास आंदोलन
मंत्रालयासमोरील दोन मोठ्या झाडांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चार कार्यकर्ते चढले. गळ्यात फास अडकवून त्यांनी सरकारने बैठक जाहीर करेपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा घटनास्थळी ठाण मांडून आंदोलकांना उतरवण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र सगळे प्रयत्न निष्फळ झाले.एकीकडे झाडावरील जीवघेणे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे काही शेतकरी मरीन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात उतरले. एका मागोमाग एक उभ्या राहिलेल्या आंदोलनांमुळे मंत्रालय, विधानभवन आणि संपूर्ण परिसरातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
बैठकीचा निरोप…
अखेर सरकारकडून हालचाली सुरू झाल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांना दूरध्वनी करून दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती दिली. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी, हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.सरकारसोबत बैठक लावण्यात आल्याचा निरोप आल्यानंतर आझाद मैदानातून रविकांत तुपकर यांनी मंत्रालयासमोरील झाडावर चढलेल्या आंदोलकांशी फोनवरून संपर्क केला. “तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, लढणारी माणसं टिकली पाहिजेत” असे तुपकर यांनी आंदोलकांना सांगितले. तुपकरांचा संदेश मिळताच मंत्रालयासमोरील झाडांवर आंदोलन करणारे कार्यकर्ते खाली उतरले. या संघर्षानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याची दिशा आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीवर अवलंबून असणार आहे. आता बैठकीत सरकार केवळ आश्वासने देते की ठोस निर्णय जाहीर करते, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
