बुलढाणा: शहराच्या मध्यवर्ती भागातील जिजामाता व्यापार-क्रीडा संकुलमधील बुलढाणा जिमखाना क्लब मध्ये काल सोमवारी ‘राडा’ झाला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यरात्रीनंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे सुसंस्कृत बुलढाण्यातील वाढती गुंडा गर्दी व धोक्यात आलेली कायदा-सुव्यवस्था अधोरेखित झाली आहे.
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकी वाहन पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून या राड्याला सुरुवात झाली. युवकांनी तुफान राडा करीत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, हॉटेलच्या काचा व साहित्याची तोडफोड केली. हॉटेल चालक स्वप्निल चोपडे यांनी पोलिसांततक्रार दिली. त्यानुसार आरोपी सतीश लोखंडे, आकाश लोखंडे (रा. वार्ड क्र २, बुलढाणा) रणधीर गवई (रा. सुंदरखेड, तालुका बुलढाणा) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी नुसार गाडी ‘पार्किंग’ करत असताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली, काचा फोडल्या. समोरच असलेला टी पॉय तोडून टाकला. यामुळे सुमारे पाऊण लाखांचे नुकसान झाले आहे.



