अकोला : महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवडीवरून अकोला महानगर काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट झाला आहे. महानगर उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांविरोधात रोष व्यक्त करून राजीनामे दिले. शहरातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या विरोधात प्रदेश काँग्रेसकडे तक्रारींचा पाढाच वाचला. या सर्व प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.

पक्षांतर्गत मोठा पेच

८० संख्याबळ असलेल्या अकोला महापालिकेत एकूण आठ स्वीकृत नगरसेवक निवडले जात आहेत. यामध्ये भाजपप्रणित शहर सुधार आघाडीकडे ४४ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने त्यांना चार, तर २१ जागा निवडून आलेल्या काँग्रेसचे दोन, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्याची निवड सोमवारी होणाऱ्या सभेत केली जाईल. काँग्रेस पक्षामध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. महापालिका निवडणुकीच्या अगोदरपासून अनेकांचा स्वीकृत सदस्य पदावर डोळा होता. त्यानुसार काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी देखील केली. ‘स्वीकृत’ म्हणून कुणाला महापालिका सभागृहात पाठवायचे? यावरून काँग्रेस पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण झाला.

आमदारांकडून भावाला संधी

आमदार साजिद खान पठाण यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन नावे प्रदेशकडे सुचवले. प्रदेश काँग्रेसने आकाश कवडे, इलीयास खान अलीयार खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. स्वीकृत सदस्य होण्यासाठी काँग्रेसने केलेल्या शिफारसीचे नावे पुढे येताच काँग्रेसमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. इलीयास खान अलीयार खान हे आमदार साजिद खान पठाण यांचे बंधू, तर आकाश कवडे यांनी पक्षाविरोधात जाऊन पत्नीला शिवसेना ठाकरे गटाच्या तिकीटावर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आता त्यांना पक्षाने संधी दिल्याने काँग्रेस अंतर्गत तीव्र नाराजी पसरली असून गंभीर आरोप केले जात आहेत.

थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

याच नाराजीतून काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांच्यासह अनेकांनी पक्षाकडे राजीनामे सादर केले आहेत. पक्षातील प्रदेशचे ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे, कामगार नेते तथा इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप वखारिया, ज्येष्ठ नेते अविनाश देशमुख, महिला अध्यक्ष पूजा काळे यांच्यासह अनेक जण नाराज असल्याची माहिती आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दिली आहे. संघटनात्मकदृष्ट्या अगोदरच खिळखिळी झालेल्या काँग्रेसला स्वीकृत सदस्य प्रकरणाचा आणखी फटका बसण्याची चिन्हे आहेत.

प्रदेशच्या आदेशाला केराची टोपली?

स्वीकृत नगरसेवक निवडण्याच्या बाबतीत काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक लढून पराभूत झालेल्यांना स्वीकृत म्हणून संधी न देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आकाश कवडे यांच्या पत्नी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढत पराभूत झाल्या आहेत. आता काँग्रेसने आकाश कवडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली. त्यामुळे प्रदेशच्या आदेशाला स्थानिकांनी केराची टोपली दाखवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.