नागपूर: आपण जर नोकरीच्या शोधात असला तर कुठलीही परीक्षा न देता शासकीय नोकरीची संधी चालून आली आहे. आपण एक अर्ज करून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही नोकरी मिळवू शकता. त्यासाठी दहावीमध्ये आपणाला किती गुण मिळाले हे महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे ही बातमी सविस्तर वाचा आणि शासकीय नोकरी मिळवा. भारतीय टपाल विभागात मेगाभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी विविध पदांच्या तब्बल २१ हजार ४१३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ मार्चपासून अर्ज भरू शकतात. भारतीय टपाल विभागाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्ज भरता येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), सहाय्यक अधीक्षक ही पदे भरली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य असले पाहिजेत. याशिवाय, उमेदवारांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. या भरतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे., म्हणजेच त्यात कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा ४० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. भरती नियमानुसार आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट, ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट तर दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्षांची सूट देण्यात आली आहे. सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर एससी/एसटी/महिला/दिव्यांग उमेदवारांसाठी कोणताही अर्ज शुल्क नाही.

-या भरतीसाठी अर्ज करणे सोपे आणि सरळ आहे.

-उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरावा लागेल.

-निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असल्याने, उमेदवारांची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

-सदर उमेदवार ३ मार्च २०२५ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

-अधिक तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for 21 thousand posts in the indian postal department dag 87 amy