वर्धा : विविध प्राणी प्रजाती दुर्मिळ, लुप्त व नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचे मानवी संगोपन व संवर्धन करण्याचे जोरदार प्रयत्न केंद्र व विविध राज्याच्या पातळीवर केल्या जात आहे. गिधाड हे त्याचे बोलके उदाहरण ठरावे. तसेच माळढोक पक्ष्याचे. आता हा एक देखणा प्राणी. लुप्तप्राय होत चाललेला. पण दुरवर सिक्कीम प्रदेशात त्याचा पुनर्जन्म झाला, त्याचीच ही गोड बातमी म्हणता येईल.
सिक्कीम येथील प्राणीसंग्रहालंय
नैसर्गिक आपत्ती आणि प्राणघातक आजारांच्या सावटाखाली चाचपडणाऱ्या वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रातून एक अत्यंत ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. सिक्कीम येथील प्रसिद्ध ‘हिमालयन झुलॉजिकल पार्क’मध्ये (Himalayan Zoological Park) गेल्या दोन महिन्यांत तब्बल सहा चिमुकल्या ‘रेड पांडा’चा (Red Panda) जन्म झाला आहे. सन १९९६ मध्ये सुरू झालेल्या ‘कॅप्टिव्ह ब्रीडिंग’ (नियंत्रित प्रजनन) कार्यक्रमानंतर एकाच वर्षात घडून आलेली ही सर्वाधिक प्रजननाची ऐतिहासिक घटना ठरली आहे. परंतु, या गोड बातमीमागे एक अत्यंत खडतर आणि थरारक संघर्ष दडलेला आहे.
१२ रेड पांडांचा करुण अंत आणि निराशा
या यशाचे महत्त्व समजून घेण्यासाठी काही वर्षे मागे जावे लागेल. २०१५ ते २०१७ या काळात या प्राणीसंग्रहालयावर संकट कोसळले होते.’कॅनाइन डिस्टेंपर’ (Canine Distemper) या अत्यंत घातक विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे या पार्कने आपले तब्बल १२ दुर्मिळ रेड पांडा गमावले होते. या घटनेमुळे जगभरातील वन्यजीवप्रेमी हादरले होते. रेड पांडा ही अतिशय संवेदनशील आणि लुप्तप्राय (Endangered) प्रजाती मानली जाते. अशा स्थितीत १२ पांडा गमावणे म्हणजे संवर्धन प्रकल्पावरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखे होते.
२ महिन्यांचे गुप्त मिशन
या कठीण पार्श्वभूमीवर यंदाच्या जून आणि जुलै महिन्यात जेव्हा तीन प्रजनन जोड्यांकडून सहा नवजात पिल्लांचा जन्म झाला तेव्हा प्रशासनाने कोणताही घाईगडबडीने आनंदोत्सव साजरा केला नाही. रेड पांडाच्या पिल्लांचे सुरुवातीचे दोन महिने हे जगण्याच्या दृष्टीने अतिशय नाजूक व धोक्याचे असतात. त्यामुळे या आगमनाची बातमी लगेच जाहीर न करता प्रशासनाने एक अत्यंत गुप्त मोहीम राबवली. तज्ज्ञ डॉक्टर, प्राणीशास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष देखरेखीखाली या पिल्लांना जनसामान्यांच्या नजरेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आले. २४ तास वैद्यकीय तपासणी आणि काळजीच्या जोरावर या सहापैकी पाच पिल्ले या कठीण टप्प्यातून सुरक्षितपणे वाचली आहेत.
आता संख्या १३ वर
सध्या या पाच वाचलेल्या पिल्लांपैकी एका नर आणि एका मादी पिल्लाची ओळख पटली असून उर्वरित तीन पिल्ले अजूनही अतिशय नाजूक असल्याने त्यांना काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या नव्या आगमनामुळे आता ‘हिमालयन झुलॉजिकल पार्क’मधील रेड पांडांची एकूण संख्या १३ वर पोहोचली आहे.
सर्वत्र कौतुक सूरू
एकीकडे हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना सिक्कीममधील हे यश म्हणजे राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखे आहे. एका पराभवानंतर जिद्दीने उभे राहत निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी लढणाऱ्या या टीमचे सध्या जगभरातून कौतुक होत आहे.
