scorecardresearch

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तरच्या निम्म्या जागांमध्ये घट! नियमित ऐवजी कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा परिणाम

भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने राज्यातील सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदांसह इतर त्रुटी बघून पदवीचे प्रवेश थांबवले होते.

warden posts vacant in hostels
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

महेश बोकडे

भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने राज्यातील सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदांसह इतर त्रुटी बघून पदवीचे प्रवेश थांबवले होते. वैद्यकीय शिक्षण खात्याने झटपट कंत्राटी शिक्षक भरल्याने या जागा वाचल्या. परंतु, कंत्राटी शिक्षकांना मार्गदर्शक (गाईड) म्हणून मान्यता नाही. त्यामुळे गेल्यावर्षीहून यंदा राज्यात आयुर्वेदच्या विविध विषयातील पदव्युत्तरच्या जागा निम्म्याने घटल्या आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : हवालाचे १.९७ कोटी रुपये कारची काच फोडून चोरून नेले

राज्यात नांदेड, उस्मानाबाद, मुंबई, नागपूर, जळगाव आणि बारामती ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालये आहेत. नुकतेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने महाविद्यालयातील या सर्वच महाविद्यालयांचे निरीक्षण केले होते. त्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागा, रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णशय्यांचा अभाव असल्याचे पुढे आले. यामुळे या महाविद्यालयातील पदवीच्या ५६३ आणि पदव्युत्तरच्या २६४ जागांचे प्रवेश थांबवण्यात आले होते. त्यावर आयुष संचालक आणि महाराष्ट्र शासन यांनी न्यायालयात जागा भरण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले.

हेही वाचा >>>नागपूर: ९ व १० फेब्रुवारीला महाराष्ट्र बंकेचा देशव्यापी संप

या घडामोडीनंतर भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने प्रवेशबंदी उठवली. त्यानंतर शासनाकडून झटपट सर्व महाविद्यालयांत रिक्त जागेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. त्यामुळे या महाविद्यालयांतील पदवीच्या जागा वाचल्या. परंतु, या कंत्राटी शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून मान्यता नाही. त्यामुळे नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, मुंबईच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील २१ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या ‘सिट मॅट्रिक’नुसार असलेल्या २४९ पदव्यूत्तर जागांची संख्या २३ जानेवारी २०२३ रोजीच्या ‘सिट मॅट्रिक’नुसार केवळ ११८ पदव्युत्तर जागांवर आली. त्यामुळे राज्यात आयुर्वेदमधील विविध पदव्युत्तरच्या जागा तब्बल १३१ जागांनी कमी झाल्या. या जागा कमी झाल्याचा फटका येथील पदव्यूत्तरला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार आहे.

हेही वाचा >>>‘नॉन क्रिमीलेअर’ची अट जाचक, उमेदवार ‘एमपीएससी’च्या मुलाखतीला मुकणार

शासनाने शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांची मान्यता व पदवीच्या जागा वाचवण्यासाठी झटपट शिक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली. दुसरीकडे प्राध्यापकांपासून इतर शिक्षकांचे दीडशे पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची प्रक्रियाही केली आहे. त्यामुळे यावर्षी पदव्युत्तरच्या काही जागांचे नुकसान असले तरी येत्या तीन महिन्यांत दीडशे कायम शिक्षक मिळाल्यावर पूर्वीच्या तुलनेत जास्त पदव्युत्तरच्या जागा मिळतील.- डॉ. राजशेखर रेड्डी, संचालक, आयुष, मुंबई.

पदव्युत्तरच्या जागा कमी झाल्यामुळे प्रावीण्यप्राप्त तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. ते खासगीत महागडे शिक्षण घेऊ शकत नसल्याने या मुलांना यंदा शिक्षण घेणे शक्य होणार नाही. शिक्षकांची सगळीच पदे स्थायी स्वरूपात भरण्याची गरज आहे.- डॉ. राहुल राऊत, राज्य सचिव, निमा स्टुडंट फोरम.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर जागांची स्थिती

(महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘सिट मॅट्रिक्स’नुसार)

महाविद्यालय जागा (२१-११-२२) जागा (२३-०१-२३)
मुंबई ५३ ३२
नागपूर ७५ २९
उस्मानाबाद ६३ २३
नांदेड ५८ ३४

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:08 IST

संबंधित बातम्या