यवतमाळ : नाती जेव्हा रक्ताची असूनही परकी होतात, तेव्हा माणूस पूर्णपणे कोलमडून जातो. पण त्याच वेळी जगाच्या पाठीवर माणुसकी शिल्लक आहे, हे यवतमाळमधील एका घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आपल्या सख्ख्या भावानेच राज्याबाहेर नेऊन बेवारस सोडलेली बिहारची लेक, रेखा चौहान, तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर यवतमाळच्या ‘नंददीप फाउंडेशन’च्या माध्यमातून सुखरूप आपल्या घरी पोहोचली आहे. एका महिलेच्या जिद्दीचा आणि निस्वार्थ सेवेचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

दुःखाचा डोंगर आणि फसवणूक

बिहारमधील नवादा जिल्ह्यातील महुली गावच्या रेखा चौहान हिचे आयुष्य एकेकाळी सुखी होते. मात्र, काळाने असा घाला घातला की त्यांच्या पोटच्या मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला. या धक्क्यातून रेखा सावरू शकली नाही आणि तिला तीव्र मानसिक आजाराने ग्रासले. सासरच्यांनी पाठ फिरवली, पण माहेरकडून असलेल्या आशेचा किरणही अंधारात हरवला.

मानसिक आजाराला कंटाळून सख्खा भाऊ टुणटुण याने, माणुसकीला नात्याला काळीमा फासत अन्य साथीदारांच्या मदतीने रेखाला बिहारच्या बाहेर नेले आणि अनोळखी प्रदेशात बेवारस सोडून दिले. आई शामादेवी आणि वडील अतवारी यांनी आपल्या लेकीची खूप वाट पाहिली, पण अखेर नियतीसमोर त्यांनीही हात टेकले. तिच्या वृद्ध आई-वडिलांना आता ती आता कधीच परत येणार नाही, असे सांगण्यात आले.

यवतमाळच्या मातीत माणुसकीचा पाझर

दुसरीकडे, नागपूर-हैद्राबाद मार्गावर यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात महामार्गाच्या कडेला एक महिला अत्यंत दयनीय अवस्थेत भटकत होती. विस्कटलेले केस, फाटके कपडे आणि डोळ्यांत दाटलेली भीती…अशा अवस्थेत ती सात-आठ महिने तिथेच होती. पांढरकवडा पोलिसांनी मानवतेचा परिचय देत या महिलेला काही महिन्यांपूर्वी नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल केले. तिथे पोहचल्यानंतर ती स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगण्याच्याही स्थितीत नव्हती.

मात्र, फाउंडेशनचे संस्थापक संदीप आणि नंदिनी शिंदे यांनी त्यांना आपल्या कुटुंबाचा घटक मानून तिच्यावर औषधोपचार सुरू केले. वेळेवर औषधोपचार, सकस आहार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘माया’ मिळाल्याने रेखाच्या काळजावरील जखमा भरू लागल्या. मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने आणि फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेमुळे रेखा हीळूहळू बोलू लागल आणि एक दिवस तिने आपला बिहारमधील पत्ता सांगितला.

दहा वर्षांनंतर भावनिक पुनर्मिलन

केवळ पत्ता शोधून फाऊंडेशन थांबले नाही. स्वयंसेवक निशांत सायरे आणि मुरलीधर गबने यांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत रेखाला थेट बिहारमधील त्यांच्या महुली गावात नेले. ज्या लेकीला मृत मानून गावाने विसर पाडला होता, तिला जिवंत समोर पाहून संपूर्ण गाव थक्क झाले. १० वर्षांपासून डोळ्यांतील अश्रू सुकलेल्या आईने जेव्हा रेखाला मिठी मारली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. रक्ताच्या नात्याने दिलेला जखमेचा घाव पुसून, यवतमाळच्या ‘नंददीप’ने एका घरातील दिवा पुन्हा प्रज्वलित केला.