अलीकडच्या काळात धार्मिक पर्यटनाकडे लोकांचा कल वाढत असताना नागपूरसह विदर्भातील धार्मिक पर्यटन फारच दुर्लक्षित स्वरुपाचे आहे. यासंदर्भात विदर्भ वैधानिक विकास मंडळाने प्रायोजित केलेल्या एका अभ्यासगटाने दिलेल्या शिफारशींमध्ये या बाबत तीव्र चिंता व्यक्त करून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
नागपुरातील दीक्षाभूमी, रामटेकचे कालिदास स्मारक, कामठीचे ड्रॅगन पॅलेस, वध्र्याचे पवनार आश्रम, शेगावचे आनंदसागर, अकोटचे जैन मंदिर, चंद्रपूरची लालबाग अशी कितीतरी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. अनेकदा लोक धार्मिक स्थळांवर काही विधी करण्यासाठी जातात. ते विधी आटपल्यानंतर निसर्ग पर्यटनाचा आनंद त्यांना घ्यायचा असतो. धार्मिक विधी आटोपल्यावर एखादे पक्षी अभयारण्य, संग्रहालय, व्याघ्रप्रकल्पाशी जोडणे, सांस्कृतिक उत्सवाचा आस्वाद घेऊन लोकांना आनंदाने नियोजित स्थळी पोहोचायचे असते. मात्र, अशाठिकाणी जाण्यासाठी, राहण्यासाठी सोय, रस्ते, पाणी, वीज, पंखे, आरोग्याच्या सुविधा नसतात. संबंधित स्थळाची माहिती देणारा वाटाडय़ाही नसतो. विदर्भाची जमीन, जंगल आणि जल पाहता स्वतंत्र पर्यटन धोरण असल्याची गरज आहे. मात्र, विदर्भात स्थळे जंगल, पाणी, वन, ऐतिहासिक कला, ऐतिहासिक मंदिरांची दुरवस्था झाली आहे. त्यातून रोजगाराची निर्मितीही होऊ शकत नाही.




विदर्भात पर्यटनाला चांगली सोय असूनही ती संस्कृती जतन न केल्याने आपण कधीचेच मागे पडलो आहोत. विदर्भात पेंच, नवेगाव बांध, नागझिरा, रामटेक, नगरधन, गाविलगड किल्ला, चिखलदरा, सर्च, लोणार, नरसळा, कचारगड गुंफा, बोल अभयारण्य, मरकडेय ही नावाजलेली पर्यटनस्थळेही दुर्लक्षित आहेत. अशा स्थळांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडणे, त्या ठिकाणी हॉटेल्स उभारणीचे काम शासन प्राधान्यक्रमाने करू शकत नसेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारीची (पीपीपी) शिफारसही या गटाने केली आहे. मात्र, अद्यापही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही.
या अभ्यासगटाच्या प्रमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, धार्मिक स्थळेही आर्थिक उलाढालीची फार मोठी केंद्र आहेत. त्यांच्या बाहेर आणि आतही मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. अनेक धार्मिक स्थळांना मिळणाऱ्या निधीचे मोजमाप होत नाही. पण, धार्मिक स्थळांच्या बाहेर असलेला व भक्तांच्या पायातील जोडे सांभारणाराही रोजगार मिळवत असतो. त्यामुळे धार्मिक पर्यटनाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही. हैदराबादला गेल्यानंतर कुतुबमिनारची माहिती देणारे पत्रक आमच्या हातात देण्यात आले. त्याची जास्तीची माहिती पाहिजे असेल तर १० रुपयांची पुस्तिका होती. पर्यटक पैसे द्यायला तयार असतात. पण, आपल्याकडे पाहिजे त्या सोयीच उपलब्ध होत नाहीत.