फाळणीच्या वाईट आठवणींचे लोकांना स्मरण करून द्या, पण हे करताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची दक्षताही घ्या, असे अजब निर्देश १४ ऑगस्टला साजरा होणाऱ्या फाळणी दिनानिमित्त (विभाजन विभिषिका स्मृती दिन) सरकारने प्रशासनाला दिले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात १४ ऑगस्टला फाळणी दिवस साजरा करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नव्या पिढीला फाळणीच्या वेदना कळाव्यात यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचा दावा सरकारद्वारे करण्यात आला आहे. फाळणीवर आधारित साहित्य, चित्रांचे प्रदर्शन आयोजित करणे, फाळणीची झळ पोहचलेल्यांना निमंत्रित करून त्यांच्या कटू आठवणी लोकांपर्यंत पोहोचवणे हा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र यातून सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका आहेच. त्यामुळे फाळणीच्या जखमा लोकांपर्यंत पोहोचवा. पण, सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची दक्षता घ्या, आवश्यकता वाटल्यास कार्यक्रम स्थळी पोलीस बंदोबस्त लावा, असे निर्देशही आयोजकांना देण्यात आले आहेत. नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत हे येथे उल्लेखनीय.

‘ फाळणी दिवस ’ कसा साजरा करायचा याबाबत केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव मनोज जोशी यांनी ५ ऑगस्टला सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून कार्यक्रमाच्या स्वरुपाविषयी माहिती दिली आहे. या पत्रानुसार फाळणीच्या कटू आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रत्यक्षदर्शी किंवा ज्यांना झळ पोहचली असेल त्यांना निमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून फाळणीच्या जखमा लोकांना सांगायच्या आहेत. मात्र हे करताना कोणाच्या भावना दुखावल्या जावू नयेत याची काळजी घ्यायची आहे.

कटू आठवणी सांगण्यावरच आक्षेप

या कार्यक्रमावरच अनेकांनी आक्षेप घेतला आहे. फाळणीच्या कटू आठवणी नव्या पिढीला सांगून काय साध्य होणार, असा सवाल केला जात आहे. सर्वोदय आश्रमाचे सद्स्य व काँग्रेसचे प्रदेश सचिव संदेश सिंगलकर म्हणाले, ज्यांनी कधीही स्वांतत्र्य लढ्यात भाग घेतला नाही ते लोक आता त्यातील त्यांचा नसलेला सहभाग दर्शवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून ज्यांना फाळणीच माहिती नाही त्यांना बोलावून विशिष्ट लोकांबाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.