नागपूर : हवामान बदलामुळे डेंग्यु, चिकनगुनिया, हिवतापासासारखे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती चारपट वाढली आहे. एवढेच नाही तर डासांची प्रजननक्षमताही वाढली आहे. चेन्नई येथील आरोग्य सल्लागार डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

नागपूर येथे आयोजित अर्थ जर्नलिझम नेटवर्कच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी ‘लोकसत्ता’शी साधलेल्या संवादादरम्यान ही माहिती दिली. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, कमी कालावधीत अधिक पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्याचवेळी विविध आजार पसरवणाऱ्या डासांच्या वाढीसाठीसुद्धा हवामान बदल हा घटक कारणीभूत आहे. राज्यात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजाराची साथ सुरू आहे. डासांमुळे पसरणाऱ्या या आजारासाठी पूरक वातावरण आहे.

हेही वाचा >>> बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?

हवामानात झालेल्या बदलामुळे डासांची भौगोलिक व्यापकता वाढली आहे. ज्या भागात काही दशकांपूर्वी डासांचे प्रमाण कमी होते किंवा ज्याठिकाणी ते नाहीच्या बरोबर होते त्याठिकाणीही डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. परिणामी, डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या विषाणूंचा प्रादूर्भाव भारतातच नाही तर जगभरात वाढला आहे, असे डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले. याशिवाय जागतिक तापमानवाढीमुळे महिला व पुरुषांमध्ये व्यंध्यत्त्वाचा धोका वाढला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढले असून अल्पवयातच अवयव काम करेनासे होत आहेत. वायुप्रदूषण, हवामान बदल यामुळे हृदय, किडनी, यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत. विशेषकरुन तापमानवाढीमुळे दरवर्षी ६.६७ दशलक्ष मृत्यू होतात, असेही डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले.

डेंग्यूचा प्रसार वाढला

एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होणारा डेंग्यूचा प्रसार २८.६ टक्के तर एई अल्बोपिक्टस या डासामुळे होणारा डेंग्यूचा प्रसार २७.७ टक्क्यांनी वाढला आहे. जगभरात दरवर्षी डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या विळख्यात ७० कोटी लोक सापडतात. दहा लक्ष लोक मृत्युमुखी पडतात. डेंग्यू या आजारामुळे दरवर्षी ३०.९० कोटी लोक प्रभावित होतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.