लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : मनोरुग्ण म्हणून कुटुंबीयांकडून होणारी अवहेलना झेलत रस्त्यावर आलेल्या रक्षा (बदललेले नाव) ला वर्षभरापूर्वी येथील येथील नंददीप फाऊंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आसरा मिळाला. ती उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली. त्यामुळे तिला कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. मात्र सख्ख्या भावाने रक्षाला दोन दिवसांपूर्वी स्थानिक मनोरुग्ण निवारा केंद्राच्या फाटकावर सोडून पळ काढला. निर्दयी अशा भावाकडून दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

सुरक्षा आणि प्रेमाची शिकवण देणाऱ्या बहीण-भावाच्या नात्याला तडा देणारी ही घटना रक्षा या बहिणीच्या वाट्याला आली. वयाची साठी पार केलेली ही महिला मानसिक आजाराने ग्रस्त आहे. ७ एप्रिल २०२४ रोजी सोनेगाव (नागपूर) येथे पोलिसांना ती बेवारस अवस्थेत सापडली. तेव्हा पोलिसांच्या विनंतीवरून तिला यवतमाळ येथील संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्याच्या नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात भरती करण्यात आले. याठिकाणी तिच्यावर ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत डॉ.श्रीकांत मेश्राम यांनी मानसोपचार केले. तिच्या समंतीने तिला तिच्या मूळगावी नागी (मंगरूळ, जि. वाशीम) येथे कुटुंबीयांच्या स्वाधीनही करण्यात आले.

आणखी वाचा-मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा

घरी औषधोपचार करून तिचा सांभाळ करण्याची गरज असताना तिच्या कुटुंबीयांनी मात्र तिला दुसऱ्यांदा नंददीपच्या फाटकावर सोडून आपली जबाबदारी झटकली. यापूर्वी या भावाने तिला नागपूर येथे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यापूर्वी एका रुग्णवाहिका चालकाच्या हातात सोपवून तेथून पलायन केले होते. अशा घटना सातत्याने घडत असल्याने मनोरुग्णांच्या बाबतीत कुटुंब आणि समाज संवेदनशून्य होत असल्याची खंत संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-आसमच्या खाण दुर्घटनेत नागपूरच्या ‘वेकोलि’कडून मदत

रुग्णवाहिका चालकाने गंडविले

रक्षावर औषधोपचार करून तिची काळजी घेण्याचे सोडून भावानेच तिला नागपूर येथे प्रादेशिक मनोरुग्णालयात नेण्याचा घाट घातला होता. तेथे दाखल करण्यापूर्वी एका रुग्णवाहिका चालकाने मनोरुग्णालयात भरती करण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने रक्षाला रुग्णवाहिकेतही बसविले. पैसे घेऊन काही अंतरावर नेले व तिला तेथेच सोडून त्या चालकाने पोबारा केला. त्यानंतर ७ एप्रिलला ती बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी नंददीपचे संचालक संदीप शिंदे यांना कळविल्यानंतर केंद्राचे स्वयंसेवक कृष्ण मुळे, कार्तिक भेंडे तसेच स्वप्नील सावळे यांच्या मदतीने तिला नागपूर येथून यवतमाळात दाखल करण्यात आले होते. येथून बरी होऊन घरी गेल्यानंतर भावाने दुसऱ्यांदा तिच्यावर मनोरुग्ण निवारा केंद्राचा आधार घेण्याची वेळ आणली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life nrp 78 mrj