वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याचा धोका

नागपूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी निवासी डॉक्टरांना करोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात काहीच कारवाई झाली नसल्याने यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून राज्यभरात संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे.

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून निवासी डॉक्टर  सेवा देत आहेत. त्याला दोन वर्षांच्या जवळपास काळ झाला असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही झाले आहे. दरम्यान, निवासी डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर  शुल्क माफीची मागणी केल्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी ती मान्य करण्याचे आश्वासन मार्डला दिल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यानंतर दुसरी लाट आली. त्यातही निवासी डॉक्टरांनी पूर्ण ताकदीने सेवा दिली. परंतु या डॉक्टरांचे  शुल्क माफ करण्याबाबत शासनाकडून काहीच कारवाई नाही. शेवटी निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबपर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.