scorecardresearch

जुन्या इमारती खचल्यास जबाबदार कोण?; मेडिकल- मेयोतील काही वार्डात अद्यापही रुग्णसेवा

मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील काही इमारती जुन्या वा जीर्ण असून तेथे रुग्णसेवा आताही सुरूच आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

नागपूर : मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील काही इमारती जुन्या वा जीर्ण असून तेथे रुग्णसेवा आताही सुरूच आहे. या इमारती खचून काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मेयोत बुधवारी वार्ड क्रमांक १ मधील प्लास्टरचा काही भाग पडला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने अनुचित घटना घडली नाही.

मेयोतील वार्ड क्रमांक १, २, ३, ४, ७, ८, ९, ११, १३, १४ हे दीडशे वर्षांहून जुने असून जिर्ण आहेत. यापैकी १३ आणि १४ क्रमांकाच्या वार्डाला तोडून तेथे सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार झाले. दीडशे वर्षे जुन्या वार्डामध्ये क्रमांक १ आणि २ चा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी व्हीएनआयटी संस्थेने मेयोचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यात काही वार्ड जिर्ण असल्याने त्वरित बंद करण्यासह वार्ड क्रमांक १ व २ हे काही वर्षे सुरू ठेवणे शक्य असल्याचा सल्ला दिला होता. वार्ड १ व २ यांना गट १ मध्ये टाकल्याने त्यावर पीडब्लूडीने विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे.

दरम्यान, बुधवारी मेयोतील वार्ड क्रमांक १ मधील प्लास्टरचा काही भाग पडल्याने येथील पीडब्ल्यूडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच पीडब्ल्यूडीने या इमारतीच्या वरील पाण्याची टाकी तोडण्याचे काम केले होते. त्यामुळे त्याच्या कंपनानेही ही इमारत कमकुवत झाल्याची चर्चा मेयो परिसरात आहे. दुसरीकडे मेडिकलच्या टीबी वार्ड परिसरातील महिला रुग्णांसाठीचे वार्ड जिर्ण झाल्याने बंद आहे. जुन्या वार्डाची डागडूजी करत पुरुषांचा आणि एमडीआर रुग्णांसाठीचा वार्ड सुरू आहे. परंतु हे बांधकामही जुने आहे. येथील त्वचारोग विभागाची इमारतही जुनी आहे. काही वर्षांपूर्वी तेथील सज्जा पडून रुग्णांचा मृत्यू झाला होता. या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मेडिकल, मेयोतील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. दोन्ही रुग्णालय प्रशासनाने मात्र कुणालाही काही होऊ नये म्हणून प्रशासन आवश्यक कारवाई करत असल्याचा दावा केला. सोबत वेळोवेळी पीडब्ल्यूडीला पत्र देऊन दुरूस्तीची मागणीही केली जात असल्याचेही स्पष्ट केले.

मेडिसीन कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव धूळखात

मेयोचा विकास तीन टप्प्यात करण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्जिकल कॉम्पलेक्स, वसतिगृह आणि काही विभाग, दुसऱ्या टप्प्यात ५०० खाटांचे मेडिसीन कॉम्प्लेक्स, प्रशासकीय इमारत तर तिसऱ्या टप्प्यात आणखी काही बांधकामांचा समावेश होता. मेडिसिन कॉम्प्लेक्सचा सुमारे २६५ कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला. परंतु काहीच निर्णय झाला नसल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. मेडिसीन कॉम्प्लेक्समध्ये सगळे क्लिनिकल विभागाचे वार्ड असणार, हे विशेष.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Responsible destruction old buildings medical patient care wards ysh

ताज्या बातम्या