करोना काळात गावी गेलेले ६० टक्केच कामगार परतले;  विदर्भात सुमारे ५०० नवीन उपाहारगृहांची भर

महेश बोकडे

नागपूर : करोना काळात विदर्भातील १५ ते २० टक्के उपाहारगृहांसह ढाबे बंद पडले होते. भीती आणि काम नसल्यामुळे हजारो कामगार त्यांच्या मूळ गावी परतले. आता करोना नियंत्रणात आल्यामुळे उपाहारगृहांचा व्यवसाय जोरातसुरू झाला आहे. परंतु ग्राहकांना सेवा देण्यासाठी पुरेसे कामगार नसल्यामुळे उपाहारगृह चालकांना अडचणी येत आहे. गावी गेलेल्यांपैकी ६० टक्के कामगार कामावर परतले आहेत. त्यातच विदर्भात सुमारे ५०० नवीन उपाहारगृहांची भर पडली आहे.

विदर्भात सुमारे ५ हजाराच्या जवळपास लहान-मोठे उपाहारगृह, ढाबे आहेत. येथे स्वयंपाकी, वेटर, सुरक्षा रक्षकासह वेगवेगळय़ा संवर्गातील कामगारांना रोजगार मिळतो. विदर्भातील वेगवेगळय़ा जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील कामगार येथे कार्यरत आहेत. करोना काळातील टाळेबंदी आणि निर्बंधामुळे हा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यामुळे १५ ते २० टक्के म्हणजे सुमारे एक हजार उपाहारगृह व ढाबे बंद पडले. उत्पन्न नसल्याने अनेक उपाहारगृह चालकांनी कामगार कपात केली. यामुळे कामगार आपल्या गावी परतले.

दरम्यान, आता करोना नियंत्रणात आल्यावर खवय्यांची पावले पुन्हा वेगवेगळय़ा उपाहारगृह व ढाब्याकडे वळू लागली आहेत. ग्राहकांची गर्दी वाढत असताना उपाहारगृह चालकांना कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे. करोना काळात बंद पडलेले उपाहारगृह इतरांनी भाडय़ाने घेऊन सुरू केले आहे. याशिवाय, नवीन उपाहारगृह आणि ढाब्यांचेही प्रमाण वाढले आहे. नागपुरात सुमारे १०० तर विदर्भात तब्बल ५०० नवीन उपाहारगृहांची भर पडली आहे. परंतु गावी गेलेल्यांपैकी ४० टक्के कामगार कामावर न परतल्यामुळे उपाहारगृह संचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खर्चात प्रचंड वाढ 

करोनापूर्वी व्यवसायिक सिलिंडर १,२०० ते १,३०० रुपयांना मिळत होते. त्याचे दर आता दुपटीने वाढून २,४०० च्या जवळपास पोहोचले आहे. खाद्यतेलासह इतर वस्तूंचेही दर वाढल्याने उपाहारगृह चालकांचा खर्च वाढला आहे. करोना नियंत्रणात आल्यामुळे विदर्भातील उपाहारगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. विदर्भात ५०० नवे उपाहारगृह सुरू झाले आहेत. परंतु वाढत्या खर्चाची सर्वच व्यावसायिकांना चिंता आहे.

– हर्षल रामटेके, संचालक, बीईंग फुडिज रेस्ट्रॉरेन्ट, नागपूर.

कामगारांच्या वेतनात २५ टक्के वाढ

एकीकडे महागाई तर दुसरीकडे कामगारांचा तुटवडा, अशा दुहेरी अडचणींचा उपाहारगृहचालकांना सामना करावा लागत आहे. कामगारांना सुमारे २५ टक्के वेतन वाढवून द्यावे लागत आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी खाद्यपदार्थाचे दर वाढवणे शक्य नाही. याशिवाय, करोना काळात गावी गेलेले काही कामगार परतलेच नाहीत. त्यांनी तेथेच व्यवसाय सुरू केला असून काही शेती करत आहेत.

– विठ्ठल चालवनकर, संचालक, द नामाज किचन, नागपूर.