कर्मचारी संपाचा फटका
नागपूर : थकीत असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी संपाचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालाला बसला आहे. संपामुळे जवळपास दोनशे परीक्षांचे निकाल रखडल्याची माहिती आहे. संपावर त्वरित तोडगा न निघाल्यास विद्यापीठासमोर अनेक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्मचाऱ्यांनी वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजनेसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. संपामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विद्यापीठातील सर्वच कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. विद्यापीठाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षांचे निकाल लावण्यास सुरुवात झालेली आहे. याशिवाय जुन्या परीक्षांचे निकालही शिल्लक आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे आवश्यक आहे. असे असताना कर्मचारी उपस्थित नसल्याने निकाल कसे लावावे हा यक्षप्रश्न विद्यापीठासमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे विविध शैक्षणिक कामासाठी विद्यार्थी दुर्गम भागातून विद्यापीठामध्ये येत असतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी परीक्षा भवनामध्ये विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी येत असतात. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संपामुळे परीक्षा भवन बंद आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी पैसे भरण्याची खिडकीही बंद आहे. परिणामी, मायग्रेशन, पदवी आणि इतर प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर असल्याने विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागते.
पीएच.डी.चे वेळापत्रक बिघडले
विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेचा (पेट) निकाल घोषित झाल्यावर विभागस्तरावर आर.ए.सी. घेण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी मान्यता मिळणार होती, त्यानंतर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. मात्र, कर्मचारी संपामुळे सर्व काम थांबले आहे. ३० तारखेपर्यंत नोंदणी करायची आहे. याशिवाय १० तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना संशोधन आराखडा (सिनॉफसिस) सादर करायचे आहेत. मात्र, आता संपामुळे पीएच.डी. मार्गदर्शकांचे मान्यता पत्र मिळालेले नाही. त्यामुळे वेळापत्रक बिघडले आहे.
