नागपूर: आधुनिक युगात गुन्हेगारीचे स्वरुप अमुलाग्र बदलले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हाच गैरफायदा घेणारे सायबर गुन्हेगार हायटेक झाले आहेत. त्यामुळे शारिरीक गुन्ह्यांपेक्षा आर्थिक गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तपास अधिकाऱ्यांना काळानुरुप तंत्रज्ञानाची कास धरून सायबर गुन्हेगारांपेक्षा दुपटीने स्मार्ट व्हावे लागेल, असा सल्ला राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी रविवारी येथे दिला.

पोलीस महासंचालक पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर दाते यांनी प्रथमच दोन दिवसीय गडचिरोली आणि विदर्भाचा दौरा केला. यात त्यांनी विशेषतः नक्षलग्रस्त भागातील मोहिमांचा आढावा घेतला. त्यानंतर नागपुरात दाखल झालेले पोलीस महासंचालक दाते यांनी रविवारी नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील गुन्हेगारी विषयाचा आढावा देखील दाते यांनी यावेळी घेतला.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निश्चितच आव्हाने वाढल्याचे नमूद करीत पोलीस महासंचालक दाते म्हणाले, येणाऱ्या काळात पोलिसांना गुन्हेगारांपेक्षा अधिक स्मार्ट व्हावे लागेल. काळात पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान  प्रशिक्षणावर भर दिला पाहिजे. जिल्हा स्तरावरही हे प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पोलीस दलात सेवा देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी पोलीस कल्याण हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे नमूद करत अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादात पोलीस महासंचालक दाते म्हणाले,  तळागाळातील समस्यांशी हवालदाराचा सर्वांत घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पोलीसांसाठी चर्चेचे दालन कायम उघडे ठेवणे गरजेचे आहे. पदाची झूल बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांशी संवाद वाढवा. पोलिस कल्याण हा केवळ घरांशी निगडीत विषय नाही. तर काळानुरुप पोलिस दलात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले, त्यांचे कुटुंब, आरोग्य, पोलीस पाल्यांच्या भविष्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कुटुंबातील हा घटक जर सुरक्षित असेल तर संकटांशी लढाणारा पोलीस कायम तत्पर राहतो. मुंबई पोलिस आयुक्त असताना असा प्रयोग राबवला होता. त्याचे चांगले सकारात्मक परिणाम समोर आले. त्यामुळे हे मॉडेल राज्यव्यापी राबवले जाणार असल्याचे संकेतही पोलीस महासंचालक दाते यांनी दिले.