अमरावती : गुजरातचे आरोग्‍यमंत्री ऋषिकेश पटेल जर लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी अमरावती मतदारसंघाचे प्रभारी असते, तर आपण नक्‍कीच लोकसभा निवडणूक जिंकली असती, असे वक्‍तव्‍य बडनेराचे आमदार रवी राणा यांनी भाजप कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत केल्‍यानंतर ऋषिकेश पटेल यांच्‍याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. भाजपचे अमरावती जिल्‍ह्याचे निरीक्षक म्‍हणून ऋषिकेश पटेल हे सध्‍या जागोजागी कार्यकर्त्‍यांच्‍या बैठका घेत आहेत. त्‍यांच्‍या समवेत मध्‍यप्रदेशचे माजी आमदार आत्‍माराम पटेल देखील प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत. या दोन ‘पटेलां’ची चर्चा जिल्‍ह्यात आता सुरू झाली आहे.

अमरावती जिल्‍ह्यातील आठही मतदारसंघांमधील प्रचार व्‍यवस्थित सुरू आहे का, याची पाहणी ऋषिकेश पटेल आणि आत्‍माराम पटेल हे करीत आहेत. मंडळनिहाय कार्यकर्त्‍यांची बैठक घेऊन क्षेत्राचे भौगोलिक आणि राजकीय अवलोकन ऋषिकेश पटेल यांच्‍या देखरेखीखाली गुजरातमधील प्रचार निरीक्षक आणि त्‍यांचे प्रतिनिधी करीत आहेत. त्यांच्याकडून प्रचाराचे नियोजन, समन्वय तसेच देखरेख करून दररोज संकलित केलेली माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येत आहे.

हेही वाचा…Video : वडेट्टीवार कन्येची शिव्यांची लाखोली, मोबाईल टॉर्चमधल्या सभेत नेमकं काय घडलं? वाचा…

भाजपच्‍या स्‍थानिक कार्यालयात भाजपच्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना युवा स्‍वाभिमान पक्षाचे बडनेराचे उमेदवार रवी राणा यांनी ऋषिकेश पटेल यांच्‍या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ऋषिकेश पटेल हे प्रत्‍येक मतदारसंघात परिश्रम घेत असून त्‍यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. ते जर लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी अमरावतीत असते, तर आपला पराभवच झाला नसता आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्‍यानंतर अमरावतीला नवनीत राणा यांच्‍या रुपात केंद्रीय मंत्रीपद लाभले असते, असे रवी राणा म्‍हणाले.

हेही वाचा…उमेदवारांचा खर्च : काहींची काटकसर, काहींचा मोकळा हात

प्रचाराच्‍या नियोजनाकडे ऋषिकेश पटेल हे जातीने लक्ष देत असून तिवसा, बडनेरा ग्रामीण भागात मंडळ, शक्‍तीकेंद्र अध्‍यक्ष, बूथ अध्‍यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांच्‍या बैठका घेण्‍यात सध्‍या व्‍यस्‍त आहेत. प्रचार संपल्यानंतर दररोज सायंकाळी व सकाळी समितीची आढावा बैठक घेतली जात आहे. भाजपा व मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी प्रचारात स्वतःला किती झोकून देतात, पक्षविरोधी कारवाई करण्यात कोणाचा सहभाग आहे का, मित्रपक्षांशी समन्वय आहे का, निवडणुकीसाठी आवश्यक प्रचार साहित्य व इतर सामग्री वेळेवर पोहोचली आहे का तसेच आपल्या उमेदवाराची सद्यस्थिती काय आहे याबाबतची तपशीलवार माहिती गोळा करून ती वरिष्ठांपर्यंत पाठविण्यात येत आहे.

Story img Loader