नागपूर : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल असून दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्याचा क्रमांक लागतो. गेल्या चार महिन्यांत मुंबई शहरात सर्वाधिक २२६ बलात्काराचे गुन्हे दाखल असून ठाण्यात ११८ तर पुण्यात ११२ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.

गेल्या चार महिन्यात मुंबईत बलात्काराचे २२६ गुन्हे दाखल असून यामध्ये २०१ आरोपींना पोलिसांनी अटक केली. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ८१ बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. ठाण्यात ११८ लैंगिक अत्याचाराची नोंद झाली तर पुण्यात ११२ गुन्हे आणि गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही १०१ महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ८२ बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयाला अपयश आल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे गुन्हे थांबवायचे असतील तर निर्भया पथक, दामिनी पथक, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक आणि सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला पुन्हा सक्रिय करणे करणे गरजेचे आहे.

हेही वाचा…भर उन्हाळ्यात वीज निर्मितीवर परिणाम, कोराडीनंतर चंद्रपूरमधीलही एक वीज निर्मिती संच बंद

ओळखीच्याच लोकांकडून छळ

तरुणी, महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींमध्ये ओळखीच्याच व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. नातेवाईक, प्रियकर, मित्र, शेजारी, वर्गमित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडूनच मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती अनेक घटनांमधून समोर आली आहे.

हेही वाचा…खोदकामात २०० वर्ष जुनी इमारत आढळली; अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात जीर्णोद्धारादरम्यान…

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने सकारात्मक प्रयत्न करावे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभागी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. महिला आयोग अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेत असतो. – आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग.