scorecardresearch

Premium

Coronavirus  : करोनाबाधिताच्या मृतदेहातून सामाजिक संसर्गाचा धोका!

मेडिकल, मेयोत इतर मृतदेहांसोबत बाधितांचे मृतदेह

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मेडिकल, मेयोत इतर मृतदेहांसोबत बाधितांचे मृतदेह

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी एकीकडे टाळेबंदीसह विविध उपाय केले जात असताना दुसरीकडे  उपराजधानीतील करोनाबाधित किंवा संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्यांचे  मृतदेह मेडिकल आणि मेयो  रुग्णालयांतील शवागारात इतर मृतदेहासोबतच ठेवले जात असून त्यातून सामाजिक संसर्ग होण्याचा धोका आहे.

टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ कमी झाली. त्यामुळे अपघातही घटले. मात्र  हत्या व इतर कारणामुळे मृत्यूंचे प्रमाण कायम आहे. या मृतदेहांचे शवविच्छेदन कायद्याने बंधनकारक आहे. दुसरीकडे सरकारने आता निमोनियाच्या प्रत्येक रुग्णाची करोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे खासगी व शासकीय रुग्णालयांत या आजाराने  कुणी दगावल्यास या व्यक्तीचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्यास मृतदेह तेथील शवागारात ठेवले जातात. विषाणूचा सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून हे मृतदेह स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था  करणे आवश्यक आहे. परंतु या रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेडिकल, मेयोत ही व्यवस्था नाही. इतर मृतदेहासोबतच ते ठेवले जात आहेत. करोना बाधीत व्यक्तीच्या मृतदेहातून हे विषाणू इतर मृतदेहात संक्रमीत होण्याचा धोका असतो. नातेवाईकांनाही संसर्गाची शक्यता असते.  दुसरीकडे मेडिकल, मेयोत उपचार घेणाऱ्यांत निम्म्याहून अधिक व्यक्ती जिल्ह्य़ाच्या बाहेरचे असतात. ते सायंकाळनंतर दगावल्यास साधनाअभावी त्यांचे मृतदेह रात्रभर शवागारात ठेवावे लागतात. ते गावाकडे नेताना दोन ते तीन पोलीस, दोनहून अधिक नातेवाईक येथे संपर्कात येतात. त्यांनाही संक्रमणाचा धोका आहे.

मेडिकल आणि मेयोच्या शवागारात सध्या रोज किमान दोन करोना संशयितांचे मृतदेह शीतपेटीत ठेवण्यासाठी येत आहेत. तर दोन ते चार शव अंत्यसंस्कारासाठी नेईस्तोवर ठेवले जातात. एखाद्या करोनाबाधिताच्या विषाणूचे संक्रमण या इतरांमध्ये होण्याचा  धोका आहे.

रुग्णालय प्रशासनाने शक्यता फेटाळली

रुग्णालय प्रशासनाकडून मात्र, करोनाच्या संशयित व्यक्तींचे मृतदेह चारपदरी प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्यावर सोडियम हायपो क्लोराईड शिंपडूनच ठेवले जात असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या विषाणूचे संक्रमण इतर शवात होणे शक्य नसल्याचा त्यांचा दावा आहे. सोबत मृतदेह नेल्यानंतर र्निजतुकीकरण केले जाते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

करोनाचा प्रादुर्भाव इतर व्यक्तींसह रुग्णांमध्ये होऊ नये म्हणून करोनाग्रस्त व संशयितांसाठी नागपूरच्या मेडिकल, मेयोसह इतरही जिल्ह्य़ांत स्वतंत्र आयसोलेशन वार्डाची सोय केली आहे. कोणी दगावल्यास मृतदेह शवागारापर्यंत  हलवताना अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो. त्यामुळे येथेच एक आयसोलेशन शवागार तयार करून ठेवण्याची गरज आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Risk of social infection spread from dead body of coronavirus patients zws

First published on: 09-04-2020 at 00:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×