अकोला : आरोपीचा पोलीस कोठडीमध्ये मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली. वाशीम न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. हा निकाल पोलीस दलासाठी मोठा धक्का मानला जात असून गृह विभागात खळबळ उडाली आहे. अखेर तब्बल १५ वर्षांनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
नेमकी घटना काय?
वाशीम जिल्ह्याच्या रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव धांडे यांच्यासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर ९ मे २०११ रोजी धाड टाकली होती. या कारवाईदरम्यान बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या एका गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली. त्या तरुणाला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होता. या मारहाणीमुळे १० मे २०११ रोजी बेग्या पवार यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली. तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. सखोल तपासाची मागणी झाली. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
‘सीआयडी’कडून ३४ दिवस तपास; पोलिसांवर हत्येचा गुन्हा
या घटनेनंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडून ३४ दिवस तपास करण्यात आला. त्यानंतर संबंधित पोलिसांविरोधात हत्येसह विशेष ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यावर दीर्घकाळ न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाकडून साक्षी व पुरावे तपासण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने आज रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
..म्हणून पोलिसांकडून अडकवण्याचा प्रयत्न
न्यायालयाच्या निकालानंतर बेग्या पवार यांच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले. अखेर न्याय मिळाला. आमच्या मुलावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. केवळ तो पारधी समाजातील असल्यामुळे पोलिसांनी त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात पीडित कुटुंबाची बाजू सरकारी वकील ॲड.श्रीराम काळू यांनी मांडली.
