नागपूर : अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले. आता तो निर्मिती व दिग्दर्शनाकडे वळला असून त्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट अंतिम टप्प्यात आहे. अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन अशा तिन्ही आघाड्यावर आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या रितेश देशमुखला लातूरसारख्या ठिकाणी राहताना बालपणी चित्रपट बघण्यासाठी शहराकडे जावे लागत होते. माणसांच्या इतर गरजांप्रमाणे मनोरंजनही मुलभूत गरज असल्याचे मत त्याने शनिवारी नागपुरात व्यक्त केले.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या सिने चौरंगीअंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रात आधुनिक मनोरंजन, शिक्षण आणि ज्ञानाचा संगम घडविणाऱ्या ‘एकल हब’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी नागपूरच्या मिहान परिसरात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता रितेश देशमुख, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष व सिने चौरंगी प्रकल्पाचे संचालक अतुल शिरोडकर यांची उपस्थिती होती.
यावेळी रितेश म्हणाला, लातूरसारख्या ठिकाणी राहात असताना आम्हाला त्याकाळी शिक्षण व मनोरंजनासाठी शहरात यावे लागत असे. इतर मुलभूत गरजाप्रमाणेच या देखील माणसाच्या गरजा असून त्या सुलभ आणि परडणाऱ्या असल्या पाहिजे. ‘एकल हब’ हा प्रकल्प ग्रामीण भागात मनोरंजनाबरोबरच शिक्षण आणि रोजगाराच्या संधीही निर्माण करेल, असे मत त्याने व्यक्त केले.
सिने चौरंगीने ग्रामीण भागात सकारात्मकता आणण्याचे व्हिजन ठेवून ‘एकल हब’ हा प्रकल्प हाती घेतला आहे, असे तो म्हणाला. प्रास्ताविकातून अतुल शिरोडकर म्हणाले, ३० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने आतापर्यंत विदर्भातील नक्षलग्रस्त भागातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून या भागातील ‘ड्रॉप आऊट’ चे प्रमाण शुन्यावर आले आहे.
आता ‘एकल हब’ प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम साधणारा हा प्रकल्प राहील.
गडकरी म्हणाले, मनोरंजन आवश्यक
माणसाला आनंदी राहण्यासाठी घर, शिक्षण, रोजगार, संस्कारासोबत मनोरंजनासारख्या मूलभूत गोष्टी मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी सिने चौरंगी प्रकल्पाच्या ‘एकल हब’ द्वारे या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असून यामुळे येथील लोकांचा हॅपी ह्युमन इंडेक्स (सुखांक) वृद्धींगत होईल, असा विश्वास केंद्रीयमंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.
गडकरी म्हणाले की, सिने चौरंगी हा नॉलेज आणि मनोरंजन यांचा ‘इंटिग्रेटेड हब’ आहे. समाजातील सामाजिक-आर्थिक मागासलेपण दूर करून समाजाची प्रगती व्हावी या संवेदनशील विचारातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. हा उपक्रम प्रत्येक गावापर्यंत नेण्याचा विचार असून त्यातून महिला व युवकांसाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शनाच्या संधी निर्माण होतील. हा प्रकल्प ग्रामीण भागात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडविणारा ठरेल, असे ते म्हणाले.
विदर्भात सर्वच जिल्ह्यात ‘एकल हब’ प्रकल्प
या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक प्रोजेक्शन तंत्रज्ञानासह दोन स्क्रीनचे (१२५ व ७५ आसन क्षमता) सिनेमा थिएटर, शिक्षण केंद्र आणि किरकोळ व्यावसायिक जागा यांचा समावेश राहील. या केंद्रांचा ऑपरेटिंग मॉडेल देखील विशेष आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत आरोग्य जनजागृती, कृषी प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास, साक्षरता अभियान आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ ते ६ या वेळेत कुटुंबासोबत पाहता येतील असे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपट दाखविण्यात येतील.
संध्याकाळी ६ ते १० या प्राइम टाइममध्ये नवीन व लोकप्रिय चित्रपटांचे प्रक्षेपण होईल. यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार असून ग्रामीण प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमाचा अनुभव मिळणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील सुमारे २० तालुक्यांमध्ये ‘एकल हब’ उभारण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही या केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे.
