नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)च्या सावित्री पथकाने वाडीतील जवाहरलाल नेहरू कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितेचे धडे दिले. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार म्हणाले, महिलांना आरटीओच्या सर्व सेवांची माहिती देणे हा सावित्री पथकाचा मुख्य उदेश आहे. रस्ता सुरक्षिततेचे नियम, वाहनाविषयक थोडक्यात यांत्रिकी ज्ञान, वाहनांचा विमा, वाहन चालवण्याकरिता लागणारा परवाना (लायसन्स) आणि वाहनांशी संबंधित जास्तीत जास्त माहिती महिलांना दिली जाईल. त्यातून अपघातावर नियंत्रण शक्य आहे. सावित्री पथकाच्या स्नेहा मेंढे म्हणाल्या, हेल्मेट, सिटबेल्ट, विरुद्ध दिशेने वाहन न चालवणे, वाहतूक थांबा, याबाबत जनजागरण करणे महत्त्वाचे आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले जाईल. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कल्पना एस. बोरकर उपस्थित होते. दरम्यान, रस्ता सुरक्षिततेविषयी महत्त्वाचे प्रश्न विचारणाऱ्या आकाश टेंभेकर, तनुश्री हुके यांना आरटीओकडून पुरस्काराने गौरवण्यात आले. सावित्री पथकातील अर्चना घाणेगावकर, गीता शेजवळ, मोनिका राठोड, मंजुषा भोसले यांच्यासह आरटीओतील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेचे धडे दिले.