पूर्व नागपुरातील अनेक रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. विशेषत: जुना बगडगंज ते छापरूनगरनगर चौक, जुना बगडगंज शास्त्रीनगर ते आंबेडकर चौक, जुना बगडगंज ते कुंभारटोली-छापरूनगर चौक, सुनील हॉटेल ते टेलिफोन एक्सचेंज चौक या चारही मार्गावरील सिमेंट रस्त्यांची कामे एसएनडीएल आणि ओसीडब्ल्यू या कंपन्यांच्या आडकाठीमुळे रखडली आहेत. शिवाय उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे काम थांबविण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने ते दोन महिन्यापासून बंद आहे.

जुना बगडगंज ते छापरूनगर चौक  ९०० मीटरचा रस्ता सिमेंटचा करण्यात येत आहे. त्याचा एक भाग पूर्ण झाला, दुसरा अपूर्ण आहे. दोन महिन्यापासून काम बंद आहे. रस्त्यावरील धुळीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतआहे. रस्त्याच्या बाजूला असलेले दोन चेंबर बंद करण्यात आले. तीन चेंबर सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास ते पाणी परिसरातील वस्तीत शिरण्याचा धोका आहे. रस्ते दुभाजक दगड लावण्यात आले नाही. रस्त्याच्या मध्ये असलेले विजेचे खांब, कडेला साचलेला कचरा याचा नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिका आणि संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारी केल्या पण, त्याची दखल घेतल्या गेली नाही.

जुना बगडगंजमधील शास्त्रीनगर ते आंबेडकर या मार्गावरील रस्ता तयार आहे. रस्ते दुभाजकाचे काम होणे शिल्लक आहे. शिवाय रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात तो अपूर्ण आहे. त्यामुळे तेथून वाहने नेताना अडचणी येतात. रस्त्याच्या एका बाजूचे काम नोव्हेंबरच्या शेवटी सुरू करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे तो पूर्ण करायला दोन महिन्याचा कालावधी लागला. या दरम्यान एक मार्ग सुरूहोता. जानेवारीमध्ये एका भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा असताना गेल्या दोन महिन्यापासून मात्र तेथील काम बंद आहे. रस्त्यावर धूळ तशीच कायम आहे. रस्त्याची अवस्थाही चांगली नाही. रस्त्याच्या बाजूची झाडे, संरक्षण कुंपण हटविण्यात आले. पूर्वी रस्ते दुभाजकावर झाडे होती. ती कापण्यात आली, आता तेथे कचरा साचलेला आहे. या रस्त्यावर सकाळी खाद्यपदार्थ विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. तेथे येणाऱ्यांची वाहने रस्त्यावर उभी असतात.

सुनील हॉटेल ते टेलिफोन एक्सचेंज चौक या मार्गावरील एका भागातील सिमेंटचा रस्ता पूर्ण झाला. दुसऱ्या भागाचे काम बंद आहे. या मार्गावर बाजारापेठ असून परिसरात आमदार कृष्णा खोपडे यांचे निवासस्थान आहे. इतवारी किराणा ओळीकडे हा रस्ता जात असल्याने त्यावर वर्दळ अधिक असते.

मात्र एकाच भागाचे काम झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. रस्त्या लगतची झाडे तोडण्यात आली. कचरापेटी  हलविण्यात आली. लोक रस्त्यावर कचरा टाकू लागले. साधारणपणे एक महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. दीड महिन्यापेक्षा जास्त दिवस झाल्यावरही दुसऱ्या भागाचे काम पूर्ण झाले नाही. रस्त्याच्या शेजारी असलेले अतिक्रमण, एसएनडीएलकडून परवानगी मिळण्यास होणारा विलंब आणि नागरिकांकडून येणाऱ्या अडथळ्यांमुळे या कारणांमुळे रस्त्याचे अकरा महिन्यात होणारे काम लांबणीवर पडले आहे.

एकूण १२ हजार कोटीचे हे कंत्राट आहे. त्यापैकी कंत्राटदाराला ४ कोटी मिळाले. टप्पा दोन मधील ही कामे आहेत. तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

रस्ते

जुना बगडगंज ते छापरूनगर

जुना बगडगंज ते शास्त्रीनगर ते आंबेडकर चौक

जुना बगडगंज टी पॉईंट ते कुंभार टोली चौक छापरू चौक,

सुनील हॉटेल टेलिफोन एक्सचेंज चौक.

कंत्राट – १२ कोटी रुपये

कालावधी – ११ महिने

व्यवसायाला फटका

जुना बगडगंज ते छापरूनगर चौक आणि सुनील हॉटेल ते टेलिफोन एक्सचेंज चौक या मार्गावरील काम गेल्या दोन महिन्यापासून बंद पडले आहे. कंत्राटदारांना सांगितल्यावर कामे होत नाही. कामे सुरू असली की दुकाने बंद ठेवावी लागतात. त्याचा व्यवसायाला फटका बसतो.

समीर राऊत, व्यावसायिक

 

चारपैकी तीन रस्त्यांची कामे पूर्ण

एसएनडीएलकडून सिमेंट रस्त्याच्या कामात येत असलेले अडथळे आणि महापालिकेने उन्हाळ असल्यामुळे काम थांबवण्याचे दिलेले आदेश यामुळे सिमेंट रस्त्याची कामे थांबविली आहेत. १२ कोटीच्या कामात चार मार्गाचा समावेश आहे. त्यातील तीन पूर्ण झाले. आजूबाजूचे काम मात्र शिल्लक आहे. नागपूर नागरिक बँकेजवळ काम करताना वीज ‘डीपी’ हटविण्यात आली. याबाबत एसएनडीएलने पोलिसांकडे तक्रार केली. ओसीडब्ल्यूने अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले. या संदर्भात महापालिकेत मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सिमेंट रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहे. जून २०१७ पर्यंत चारही मार्गाच्या कामाची मुदत असून त्यापूर्वी ते पूर्ण होतील. आतापर्यंत ४ कोटी रुपये मिळाले असून उर्वरित निधी मात्र काम पूर्ण झाल्यावर मिळेल.

के. जयप्रकाश, कंत्राटदार