महापालिकेचे नियंत्रणच नाही

नागपूर :  शहरातील विविध बाजारांच्या ठिकाणी वाहनतळाबाबत योजना तयार  असली तरी महापालिका प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. याचा फायदा घेत अनेक बाजारात रस्त्यावरच अनधिकृत वाहनतळ निर्माण करण्यात आले आहेत. येथे काही असामाजिक तत्त्वाकडून नागरिकांची लूट केली जात  आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे यावर कुठलेही नियंत्रण नाही.

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. बर्डीवरील नेताजी बाजारात महापालिकेचे अधिकृत वाहनतळ नाही. त्यामुळे त्या परिसरातील  युवकांनी त्या ठिकाणी अवैध वाहनतळ सुरू केले आहे. प्रत्येकाला वाहनतळावर वाहन लावण्यासाठी सक्ती केली जात आहे. आधीच बाजारात नागरिकांची गर्दी होत असताना रस्त्यावर वाहन लावत प्रती दुचाकी १० रुपये वसूल केले जात आहेत. सांगितलेल्या ठिकाणी वाहन ठेवले नाही तर जबरदस्तीने ते ठेवून पैसे वसूल केले जातात. ही मंडळी बळजबरीने पैसे घेतात, मात्र कुठलीही पावती देत नाही. यावर महापालिकेच्या बाजार विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. कॉटेन मार्केट, सक्करदरा बाजारात याच पद्धतीने अवैध  वसुली जोरात सुरू आहे.

एकीकडे नागपूरची  स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना बाजारातील वाहनतळाच्या समस्येवर मात्र अजूनही तोडगा निघाला नाही. रामदासपेठ परिसरात ई-पार्किंग सुरू करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर त्यावर कुठलीही कारवाई नाही. वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियमांचे पालन न करण्याची वाढती प्रवृत्ती आणि शहराचा वाढता पसारा बघता अनेक भागात पार्किंग झोनची गरज आहे. त्याकडे महापालिका, वाहतूक पोलीस, प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षामुळे सीताबर्डी, धरमपेठ, महाल, इतवारी, सदरसह शहरातील विविध भागात वाहनतळाची समस्या वाढतच आहे.