गुरुदेवनगर परिसरातील थरारक घटना; १३ लाख रुपयांची रोकड लंपास

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेले खुनाचे सत्र थांबण्याची चिन्हे नसून रविवारी मध्यरात्री नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुदेवनगर परिसरातील पेट्रोप पंपावरील चौकीदाराचा निर्घृण खून करून १३ लाख रुपयांची रोख पळवली.

नूर खॉ मदर खॉ (७०) रा. हसनबाग असे मृत चौकीदाराचे नाव आहे. गुरुदेवनगरमध्ये मुस्तफा हसनजी यांच्या मालकीचे पंचशील ऑटोमोबाईल या नावाने पेट्रोल पंप आहे. १२ वर्षांपासून नूरखा येथे चौकीदार होते. रविवारी रात्री ते पंपावर आले. मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास सहा दरोडेखोर दुचाकीने परिसरात आले. त्यांचा चेहरा बांधून असल्याने नूर खॉ यांना संशय आला. त्यांनी त्यांना हटकले व पंप परिसरातून निघण्यास सांगितले. मात्र, दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पंपाच्या कॅबिनचा दरवाजा उघडला व सुमारे ३० किलो वजनाची तिजोरी घेऊन दरोडेखोर पसार झाले. तिजोरीमध्ये १२ लाख ६९ हजार रुपयांची रोख होती. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी आले. त्यांना चौकीदार मृतावस्थेत आढळून आला. केबिनमधील तिजोरी गायब होती. त्यांनी मालकाला माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळवले. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दरोडा टाकून खून केल्याचा गुन्हा दाखल केला.

कर्मचारीच निघाले दरोडेखोर

हत्याकांड व दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे समोर आले. ईरशाद व सुनील चव्हाण यांच्यासह इतर दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण याने पंधरा दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपावरील काम सोडले होते. तर ईरशाद अजूनही कामावर आहे.

बिअर शॉपी परिसर गुन्हेगारांचा अड्डा

गुरुदेवनगर पेट्रोल पंपासमोरील एनआयटी कॉम्प्लेक्?समध्ये बियर शॉपी आहे. त्याव्यतिरिक्त परिसरातील इतर बिअर शॉपी आहेत. त्या ठिकाणी तरुणाई व गुंड प्रवृत्तीचे मुलं रस्त्यावरच बिअर पिताना दिसतात. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून पोलिसांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. बिअर शॉपीमध्ये दारू पिण्याची परवानगी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे. बिअर शॉपींमध्ये येणाऱ्यांपैकीच दरोडेखोर असणार, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बुटीबोरीतही एकाचा खून

बुटीबोरी परिसरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर राजपूत ब्रिक्स कंपनीजवळ एका ३५ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या घटनांनी शहरासह ग्रामीण भागातही एकच खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. चौकीदाराचा खून आणि दरोडय़ाची घटना त्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र तपासले असून त्यात दरोडेखोर दिसत आहेत. याशिवाय श्वानपथकाने काही ठिकाणी दरोडेखोरांच्या दुचाकीच्या टायरच्या खुणाही शोधल्या आहेत.