नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाचपैकी तीन उमेदवारांचा विजय झाल्याने आघाडीत आनंदाचे वातावरण आहे. महायुतीतील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उघडपणे, तर काहींनी लपूनछपून मदत केल्याचा दावा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला.
‘महायुतीतील अनेक नेते आमच्या बाजूने’
विधान परिषद निवडणुकीतील विजयाबाबत बोलताना खडसे यांनी महायुतीतील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचे सांगितले. काहींनी उघडपणे मदत केली, तर काहींनी छुप्या पद्धतीने सहकार्य केल्याने त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना झाल्याचा दावा त्यांनी केला. ‘ये अंदर की बात है, महायुतीवाले बहुत सारे हमारे साथ है,’ असे म्हणत महायुतीतील अनेक नेते आपल्या बाजूने असल्याचे त्यांनी सूचित केले. महायुतीने आपल्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवले होते. त्यामुळे कोणी मदत केली, याची त्यांना कल्पना असल्याचेही खडसे म्हणाल्या.
महाविकास आघाडीचा विजयाचा ‘विनिंग रेशो’
महाविकास आघाडीच्या पाचपैकी तीन उमेदवारांचा विजय हा आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे खडसे यांनी नमूद केले. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास काय निकाल लागू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी नियोजनाचा अभाव राहिला असण्याची शक्यता त्यांनी मान्य केली. आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून, ज्या ठिकाणी चुका झाल्या असतील, त्यात सुधारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमधील विजयाचे अभिनंदन; निलंबनाचा निर्णय पक्षाचा
नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवून विजय मिळविल्याबद्दल खडसे यांनी समाधान व्यक्त केले. काही नेत्यांनी या विजयाबद्दल अभिनंदन केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांच्या निलंबनाबाबत विचारले असता, त्यांच्या संदर्भातील निर्णय पक्ष घेईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ईव्हीएमविरोधात भूमिका कायम; आंदोलनाचा इशारा
ईव्हीएमविरोधातील मोहीम सुरूच राहणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. २०२४ मध्ये ईव्हीएमसंदर्भातील त्रुटींबाबत न्यायालयात तक्रारी करूनही न्याय मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला. ईव्हीएमबाबत शंका असताना त्याच पद्धतीने निवडणुका घेण्याचा आग्रह का, असा सवाल उपस्थित करत सरकारने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान त्यांनी दिले. परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरही त्यांनी टीका केली. शेतकरी, महिला आणि बेरोजगारांना न्याय मिळेपर्यंत विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही खडसे यांनी दिला.
