नागपूर : विदर्भातील अपुऱ्या पावसामुळे खरीप पिके संकटात असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झालेल्या भागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाची स्थिती, खरीप पिकांचे संकट, कर्जमाफी तसेच धानाच्या खरेदीदरावरून सरकारवर टीका केली. त्यानंतर छत्रपती चौकातील एका उपाहारगृहात त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चहा-न्याहारी केली.

अपुऱ्या पावसाने खरीप पिके संकटात

“महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. विदर्भात पावसाची ४० टक्के तूट आहे. मराठवाड्यातही अशीच परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील काही जिल्हे वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाची कमतरता आहे,” असे पवार म्हणाले. सोयाबीन, कापूस आणि धान ही खरीप पिके संकटात आली असून, पाऊस न झालेल्या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादकता घटण्याची शक्यता असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस असलेल्या भागात दुष्काळ जाहीर करावा, असेही त्यांनी सांगितले.

भंडारा-गोंदियानंतर मराठवाड्यात आंदोलन

शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जनक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील क्रीडा येथेही मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील चार-पाच दिवसांत मराठवाड्यातही आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कर्जमाफी आणि धानाच्या दरावरून सरकारवर निशाणा

राज्यातील कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करताना पवार म्हणाले की, “अनेक अटी-शर्ती लावण्यात आल्या. त्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन आणि उपोषण करावे लागले.” ५५ लाख शेतकऱ्यांपैकी ४० लाखांना कर्जमाफी मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला. कर्जमाफी झाल्याचे दाखविलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रात ३ कोटी ४० लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले, तर केवळ १ कोटी ४० लाख क्विंटल धानाची २,३६९ रुपये दराने खरेदी झाली, असा दावा त्यांनी केला. छत्तीसगडमध्ये ३,५०० रुपयांना धान खरेदी होत असल्याचे सांगत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बोनस द्यावा आणि यंदा धानाची खरेदी ३,६०० रुपये दराने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सदावर्ते हे फडणवीसांचे ‘शूटर’ : पवार

मनोज जरांगे यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या टीकेवरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सदावर्ते यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांनी, “सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे शूटर आहेत,” असा आरोप केला. मोठ्या नेत्याने थेट बोलण्यापेक्षा अशा व्यक्तींना पुढे करून आरोप-प्रत्यारोप सुरू ठेवले जात असल्याचे ते म्हणाले. सदावर्ते बोलतात म्हणजे फडणवीस बोलतात, असे राजकीयदृष्ट्या म्हणता येईल, असा दावाही पवार यांनी केला. यावेळी नागपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष धनेश्वर पेठे, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीचे अध्यक्षसलील देशमुख आणि रमेश बंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.