बुलढाणा : सुमारे साडेतीन दशकापूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गलिच्छ शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड ( शिवसेना शिंदे गट ) यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली. यामुळे राज्याच्या राजकीय, साहित्यिक वर्तुळात वादळ उडाले असून मोठा वाद निर्माण झाला आहे.

वादात रोहित पवारांची उडी

या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) नेते आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. कोल्हापूरमध्ये प्रकाशक आंबी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, यासाठी काल त्यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तळ ठोकला. याच वेळी प्रसार माध्यमाशी बोलताना रोहित पवार यांनी या प्रकरणी आक्रमक आंदोलनाची घोषणा केली. यावेळी प्रकाशक प्रशांत आंबी देखील हजर होते.

कसे असेल आंदोलन?

या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ २८ एप्रिलला बुलढाण्यात आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. यावेळी ‘शिवाजी कोण होता ?’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले . बुलढाणा शहरातील आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर २८ एप्रिलला हे निषेध आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे रोहित पवारांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.

आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे पुत्र कुणाल (मृत्युंजय ) गायकवाड यांची दबंगगिरी बुलढाणेकरांनी व्हायरल व्हिडीओ व ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पाहिलीच आहे. यावेळी पोलिसांनी आजवर संजय गायकवाड यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या कारवाईची, दाखल केलेल्या गुन्ह्याचा, कलमांचा आढावा घेतला जाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

पोलीस विभाग अलर्ट मोडवर

या घोषणेने बुलढाण्यात खळबळ उडाली असून पोलीस विभाग सतर्क झाला आहे. शिवीगाळ व धमकी प्रकरणावरून आधीच बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पवारांच्या घोषनेने भर पडली आहे. प्रकाशक आंबी शिवीगाळ प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असली तरी पुस्तकाचे शीर्षक आणि मजकुराबद्दल आपला आक्षेप कायम असल्याचे संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच बुलढाण्यात पुस्तकाचे जाहीर वाचन करणाऱ्यांनी शिवरायांचा आदरार्थी उल्लेख करावा, असे आवाहन देखील केले आहे.

दुसरीकडे, हे आंदोलन आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर करण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या स्थितीत आंदोलनाला पोलीस परवानगी देणार का? आमदारांच्या घरासमोर आंदोलन होणार की अन्य स्थळी?, त्याला पवार राजी होणार का?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.