नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माजी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांना उद्देशून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणाशी संबंधित चर्चांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्यात प्रफुल पटेल उपस्थित होते का, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. या मुद्द्यावर प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांच्या निवेदनात काय?

रोहित पवार यांनी सामाज माध्यमांवर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित अपघात किंवा संभाव्य घातपाताशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाचा विवाह अलीकडे राजस्थानमध्ये पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“प्रफुल पटेल साहेब, आपण त्या विवाह सोहळ्यास उपस्थित होता का? जर आपण त्या कार्यक्रमाला गेले असाल, तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले इतर नेते कोण होते आणि ते कोणत्या पक्षाशी संबंधित होते, याची माहिती महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावी,” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अजितदादांचे खरे समर्थक असाल तर…

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, “आपण अजितदादांचे खरे समर्थक आहात की केवळ स्वार्थासाठी राजकारण करता, हे आता महाराष्ट्रासमोर स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

राजस्थानमधील विवाह समारंभाचे कनेक्शन काय?

दरम्यान, राजस्थानमध्ये पार पडलेल्या या कथित विवाह सोहळ्याबाबत विविध राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या पक्षांतील काही नेत्यांची उपस्थिती होती, अशा चर्चाही सुरू आहेत. मात्र, या संदर्भात अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

पटेल यांच्या भूमिकेकडे लक्ष

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अजित पवार यांच्या कथित अपघातप्रकरणाशी संबंधित आरोपांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला अधिक राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत.या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांची भूमिका काय असणार, तसेच त्यांनी राजस्थानमधील त्या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली होती का, याबाबत राजकीय वर्तुळासह जनतेचेही लक्ष लागले आहे. आगामी काळात या विषयावर प्रफुल पटेल काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.