बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )चे नेते आमदार रोहीत पवार यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरासह तालुक्यातील विविध गावांना सांत्वन पर भेटी दिल्या. विविध गावातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराना त्यांनी भेटी दिल्या.

शेतकऱ्याना दिलासा

राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह राजमाता जिजाउंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा नगरिसह तालुक्यातील रताळी, साखरखेर्डा, आणि बामखेड या गावांना भेटी दिल्या. आमदार रोहितदादा पवार यांनी दुष्काळामुळे आत्महत्याग्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबियांची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

​ऐन दुष्काळाच्या कठीण काळात घरातील कर्ता माणूस गेल्याचे दुःख अथांग आहे. या कठीण प्रसंगात कुटुंबियांना धीर देत आमदार रोहितदादांनी “आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत” हा विश्वास दिला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

शेतकऱ्यांनी साश्रू नयनानी मांडली व्यथा

​याप्रसंगी या गावातील संकटग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्या समक्ष आपली व्यथा मांडली. अपुरा पाऊस, सोयाबीन, तुर आदि खरीप पिकांचे झालेले प्रचंड नुकसान, बिकट आर्थिक स्थिती त्यांनी विषद केली. यावर त्यांना दिलासा देत आम्ही खंबीर पणे तुमच्या पाठीशी असल्याचे पवार यांनी सांगितले. या संकट काळात धीर आणि संयम बाळगण्याचे विनम्र आवाहन त्यानी केले.

या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. प्रसेनजित पाटील, नरेश शेळके, ज्योती खेडेकर, सिंदखेड राजा पालिकेचे अध्यक्ष सौरभ तायडे तसेच अमोल भट, आशिष वायझोडे, अरुण मोगल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.