नागपूर : गेल्या दोन महिन्यापासून शहरात सीएनजी इंधनाचा पुरवठा करणाऱ्या रॉमॅट कंपनीने पुरवठा करण्यास नकार दिल्याने शहरात केवळ ७० पैकी १० बसेस सीएनजीवर सुरू आहे. सीएनजीवर शहरात आपली बसेस चालवण्यात आल्यानंतर त्याचे देशभर कौतुक करण्यात आले मात्र, आता सीएनजीचा पुरवठा करण्यास नकार दिल्याने महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे.

महापलिकेने ७० डिझेलवर चालणाऱ्या आपली बसेस सीएनजी इंधनावर परिवर्तीत केल्या. मात्र, या बसेसला रॉमॅट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने फेब्रुवारीपासून सीएनजी इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. ‘आपली बस’च्या ताफ्यातील सीएनजी बससेवा अचानक बंद केल्याने तिन्ही ऑपरेटर्सवर व कंपनीवर महापालिकेने दंड ठोठावला. त्यानंतर तीन महिने सीएनजीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र आता पुरवठा करणे शक्य नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आल्यामुळे ७० पैकी केवळ १० बसेस शहरात धावत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या रॉमॅटने पहिल्यांदा ट्रॅव्हल टाइम सिटी बस कंपनीचा इंधन पुरवठा ३१ मार्च रोजी बंद केला. त्यानंतर हंसा सिटी बसचा ७ एप्रिलला, तर आर.के. सिटी बसचा ८ एप्रिलला इंधन पुरवठा बंद करण्यात आला. तेव्हापासून पुरवठा बंद आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून नियमित इंधन पुरवठा होत नाही. त्यामुळे सीएनजीच्या सर्व बसेस बंद आहेत. याचा मोठा आर्थिक फटका महापालिकेला बसत आहे. कंपनीने पुरवठा बंद केल्यामुळे त्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. १५ जुलैपर्यंत पुरवठा करण्यात आला नाही तर त्यांच्यासोबत झालेला करार रद्द करून कारवाई केली जाणार आहे.

रवींद्र पागे, परिवहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक