scorecardresearch

पोहरादेवी विकास आराखडय़ातून बंजारा समाजाचे दर्शन – मुख्यमंत्री

बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे

पोहरादेवी विकास आराखडय़ातून बंजारा समाजाचे दर्शन – मुख्यमंत्री
कार्यक्रमात संबोधित करताना मुख्यमंत्री व व्यासपीठावर इतर उपस्थित मान्यवर, दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित जनसमुदाय.

* शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यावर्षी ४० हजार कोटींची वाढ   * विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट

देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली आहे. या विकास आराखडय़ाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विकास आराखडय़ाची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशीम) येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वाशीमचे पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार मनोहर नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख रामराव महाराज, माजी आमदार अनंतराव पाटील, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराव महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेचे श्रद्धास्थान आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेही हे श्रद्धास्थान असल्याने त्यांची परंपरा कायम ठेवणार असून यापुढेही प्रत्येकवर्षी आपण पोहरादेवी येथे येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. बंजारा आणि वंजारी यांचे सांस्कृतिक ऋणानुबंध प्राचीन असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना पोहरादेवी येथे येऊन फक्त घोषणा केल्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरादेवीवरील श्रद्धा कृतीतून सिद्ध केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. आ. राजेंद्र पाटणी यांनी अकोला-मंगरूळपीर-पोहरादेवी-दिग्रस हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. तसेच रेल्वे मार्गासाठी १३०० कोटी दिल्याने पोहरादेवी येथे देशभरातून येणाऱ्या भक्तांना अधिक सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाची आज सांगता

विश्वशांतीसाठी अखिल भारतीय बंजारा शक्तीपीठाच्यावतीने २४ मार्चपासून लक्षचंडी महायज्ञ सुरू करण्यात आला आहे. या महायज्ञाची सांगता ३ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतले. जगदंबा माता मंदिर येथे कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला पोहरादेवी येथे जमलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोली भाषेतून साद घातली. गेल्या दोन वर्षांपासून पोहरादेवी येथील यात्रेला येण्याची इच्छा होती, आज ही इच्छा पूर्ण झाल्याने आनंद झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी बंजारा भाषेतून व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-04-2017 at 05:40 IST

संबंधित बातम्या