नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर महापालिका निवडणुकीत मतदान करतांना महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, अराजक म्हणजे राजा नसणे ही स्थिती वाईट आहे. ते नेमके काय म्हणाले याबाबत आपण जाऊन घेऊ या.
लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्याला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे महत्त्वाचे असून मतदानाच्या दिवशी मतदान करणे हेच प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. याच भावनेतून आपण स्वतः पहाटे मतदानासाठी उपस्थित राहिलो आहे, असेही प्रतिपादन मोहन भागवत म्हणाले.
मतदान करताना केवळ वैयक्तिक पसंती नव्हे, तर जनहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला पाहिजे, असे भागवत यांनी स्पष्ट केले. मतदानाबाबत निवडणूक आयोग सातत्याने जनजागृती करत असतो, तसेच समाजातील जबाबदार घटकही नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करत असतात. याचा सकारात्मक परिणाम होण्यास काही काळ लागू शकतो, मात्र तो नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘नोटा’च्या पर्यायावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, नोटा म्हणजे सर्व उपलब्ध उमेदवारांना नकार देणे होय. मात्र उपलब्ध पर्यायांमधून सर्वोत्तम उमेदवाराची निवड करणे अधिक योग्य ठरते. “अराजक म्हणजे राजा नसण्याची अवस्था असून ती सर्वात वाईट स्थिती आहे. महाभारतातही याचा उल्लेख आहे,” असे सांगत त्यांनी निर्णय न घेण्यापेक्षा उपलब्ध पर्यायांमधून योग्य निवड करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
कोणालाही निवडून न देणे, म्हणजेच नोटाचा वापर करणे, अप्रत्यक्षपणे नको असलेल्या शक्तींनाच मदत करते, असा इशाराही भागवत यांनी दिला. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले मत विचारपूर्वक आणि जनहिताच्या दृष्टीने वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
