नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक’ चित्रपट तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिल्लीतील केशव कुंज येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी आपले विचार मांडले. त्यांनी या चित्रपटाला केवळ एक सिनेमॅटिक कलाकृती नव्हे, तर एका वैचारिक प्रवासाचे जिवंत चित्रण असे संबोधले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हा चित्रपट म्हणजे भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची सिनेमॅटिक झलक आहे. संघाच्या कार्याबाबत चर्चा होत असली तरी प्रतिमा आणि वास्तव यामध्ये अनेकदा अंतर राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकत डॉ. भागवत म्हणाले, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते आणि राष्ट्रसंघटन व सामाजिक जागृतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांचे जीवन त्याग, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या अढळ भावनेचे प्रतीक होते. ‘शतक’ या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील एका गाण्यात त्यांच्या बालपणातील एक हृदयस्पर्शी प्रसंग सुंदररित्या उलगडण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ताकद आणि निर्धार दिला. तसेच त्यांनी चित्रपटाशी संबंधित संपूर्ण कलाकार, निर्माते आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानले. आरएसएसच्या १०० वर्षांच्या प्रवासाला समर्पित असलेला ‘शतक’ हा चित्रपट २० फेब्रुवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाबद्दल काय म्हणाले गडकरी ?
लोकांना संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहाण्याचे आवाहन करत गडकरी म्हणाले, एक स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की, प्रतिमा आणि वास्तव किंवा समज आणि प्रत्यक्ष सत्य यामध्ये अंतर राहिले आहे. दुर्दैवाने हे संघाबाबत घडले आहे. मी आपण सर्वांना आवाहन करतो की, जवळ या, संघाची विचारधारा जाणून घ्या आणि त्याग, समर्पण व देशभक्तीची भावना समजून घ्या. ते पुढे म्हणाले, मी रस्ते, पूल आणि बोगदे यांवर काम केले. मी अभियंता नव्हतो, ना मला आधीचा अनुभव होता. लोक विचारतात हे कसे शक्य झाले? मी सांगतो, मी संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. या संस्थांकडून मिळालेल्या मूल्यांनीच मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो.
