scorecardresearch

संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टीका

डॉ. बंग यांनी भाषणात भांडवलशाही, जागतिक तापमानवाढ आणि हिंसाचार या प्रमुख मुद्यांवर भाष्य केले.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजवण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी, असे वाटते. संघाने स्थापनेनंतरच्या काळात कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते त्यांना अपेक्षित समाजमन घडवण्याचे काम करीत होते. यासाठी त्यांनी शिक्षण, विविध संस्था, साहित्य, नाटक आणि इतर सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला, अशी टीका ज्येष्ठ गांधीवादी डॉ. अभय बंग यांनी येथे केली.

साधना प्रकाशन व सेवाग्राम कलेक्टिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी विषय’ या तीन ग्रंथांचे प्रकाशन रविवारी सर्वोदय आश्रमात झाले. याप्रसंगी ‘सद्य:स्थिती आणि गांधी विचार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश पांढरीपांडे होते. 

डॉ. बंग यांनी भाषणात भांडवलशाही, जागतिक तापमानवाढ आणि हिंसाचार या प्रमुख मुद्यांवर भाष्य केले. जागतिक हिंसाचारावर बोलताना ते म्हणाले, ‘‘धार्मिक आणि वांशिक हिंसाचार जगभरात आधीपासूनच आहे. भारताबद्दल विचार करता, इस्लाम-हिंदू यांच्यातील युद्ध प्रकट नसले तरी ते मानसिक पातळीवर होते आणि गेले एक शतकभर त्याला खतपाणी घालण्यात आले. धार्मिक द्वेष रुजवला गेला. तो पुढचे ६० ते ७० वर्षे राहणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जणूकाही शतकाची रणनीती आखली असावी, असे वाटते. त्यांनी स्वातंत्र्य लढा आणि इतर कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते माणसांची मने घडवण्याचे काम करीत होते.’’

‘‘भाजपला १९८४ मध्ये लोकसभेत केवळ दोन जागा होत्या़  बाबरी मशीद पाडणे, अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी रथयात्रा काढणे या मुद्दय़ावरून देशात राजकीय परिवर्तन घडले. त्याचा फायदा भाजपला झाला व लोकसभेतील त्यांचे संख्याबळ वाढले. आज भारतात काय घडते आहे, हे सर्वाच्या डोळय़ासमोर आहे. धार्मिक द्वेषभावना इतक्या खोलवर रुजवली गेली की, प्रत्येकाच्या मनामध्ये जगाचे दोन गटच पडले. याचा सर्वाधिक परिणाम तरुणांवर होत आहे. बालमनावर रुजवलेले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावरच संपेल’’, असे डॉ़ बंग म्हणाल़े

गांधीविचार आशेचा किरण

आज देशात धार्मिक द्वेषभावना बळकट झाली आह़े  ही स्थिती बदलण्यासाठी गांधीविचार आशेचा किरण आहे. त्यासाठी गांधीविचाराच्या लोकांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, असे डॉ. बंग म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rss spreading religious hatred in society dr abhay bang s zws

ताज्या बातम्या