नागपूर : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांवर केलेल्या विधानाला उपरोधिक निषेध करण्यासाठी अभिजीत दीपके नावाच्या तरुणानं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. इन्स्टाग्रामवर हा पक्षाला जोरदार पाठिंबा मिळाला. अवघ्या आठवड्याभरात पक्षाच्या फॉलोअर्सचा आकडा २ कोटींच्या पुढे गेला आहे. या बाबतीत कॉकरोच जनता पार्टीनं भारतीय जनता पक्षालादेखील मागे टाकलं आहे. कॉकरोच जनता पार्टीची लोकप्रियता दिवसागणित वाढत असताना अभिजीत दीपके सोशल मीडियावर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना, त्यांच्यावरील आरोपांना उत्तरं देत आहेत. कॉकरोच जनता पार्टीला मिळालेल्या वाढत्या पाठिंब्याबद्दल भाजप नेत्यांनी टीका केली आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॉकरोच जनता पार्टीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे.

संघाच्यावतीने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

…तर भारताचे विभाजन कधीच झाले नसते

शंभर वर्षांच्या संघाच्या इतिहासात आमच्यावर अनेक टीका झाल्या. परंतु, संघाने कधीही कुणावर आरोप केले नाहीत. भारताच्या विभाजनाला संघाचा सुरुवातीपासून विरोध होता. देशाचे तुकडे व्हायला नकोत, सर्व हिंदू एकत्र राहावे अशीच संघाची भूमिका होती. परंतु, त्या काळात संघ आजच्याएवढा शक्तिशाली नव्हता. तो मजबूत असता तर भारताचे विभाजन कधीच झाले नसते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले.

सर्वांचा ‘डीएनए’ एकच

हिंदू धर्माच्या एकत्रीकरणासाठी संघाची स्थापना झाली. भारतातील प्रत्येक व्यक्ती हा हिंदूच आहे. सर्वांचा ‘डीएनए’ एकच आहे, असे संघ मानतो. आम्ही कधीही कुणाचा विरोध करत नाही, संघाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. देशाच्या विभाजनाचे चटके आजही अनेक लोक सहन करतात. त्यामुळे तेव्हा विभाजनाचा किती त्रास झाला असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. संघाने आपल्या शक्तीनुसार त्या काळातही विभाजनाला विरोध केला. पुढे संघावर बंदी आली. परंतु, लोकशाही मार्गाने आम्ही लढत राहिलो आणि संघावरील बंदी मागे घेण्यात आली. संघाचा कुठलाही छुपा अजेंडा नाही, हिंदू राष्ट्राची एकता हा एकमेव हेतू आहे, असे आंबेकर म्हणाले. शहरी नक्षलवाद संपवण्याचे काम समाजच करेल. त्यासाठी वेगळी मोहीम उभारण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘जय भीम, लाल सलाम’ ही घोषणा कितपत योग्य?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० नोव्हेंबर १९५६ ला ‘गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर शेवटचे भाषण देताना बुद्धांचा शांतीचा संदेश असेपर्यंत आपल्याला मार्क्सच्या मार्गावर चालण्याची गरज नाही असे आवाहन केले होते. संविधान सभेच्या भाषणातही साम्यवादाचा संविधानाला सर्वात मोठा धोका आहे, याकडे लक्ष वेधले होते. ज्या साम्यवादी विचारणीचा बाबासाहेबांनी विरोध केला, त्याच बाबासाहेबांच्या विचाराचे तरुण आज ‘जय भीम, लाल सलाम’ अशा घोषणा देतात हे कितपत योग्य आहे? असा सवाल आंबेकर यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही संघाचा विरोध केला नाही. तसेच संघाच्या शाखेलाही त्यांनी भेट दिली होती. महात्मा गांधी यांनीही सेवाग्रामध्ये असताना डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली होती. त्यांनी संघाच्या शाखांनाही भेट दिली होती, असेही आंबेकर म्हणाले.

कॉकरोच जनता पार्टीला प्रश्न विचारण्याचा अधिकार

कॉकरोच जनता पार्टीवरून देशात सर्वत्र चर्चा आहे. यावर आंबेकर यांना प्रश्न विचारला असता, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तरुणांचे प्रश्न असतील तर त्यावर चर्चा होणे गैर नाही. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीचा विरोध करणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. या देशातील तरुण पिढी प्रचंड आशावादी असून त्यांच्यामध्ये नकारात्मक भाव नाही. आपल्या देशातील तरुणांनी नक्षलवादालाही नाकारले, असेही आंबेकर म्हणाले.