नागपूर : महात्मा गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत काँग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने आरोप केले जातात. त्यातच नागपुरात संघविचारांशी संबंधित स्वदेशी संकल्प यात्रा समितीने गांधी जयंतीनिमित्त दोन कार्यक्रम आयोजित केले आहेत. जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘स्वदेशी आणि गांधीजी’पासून ‘संविधान आणि स्वदेशी’पर्यंत विविध विषयांवर सभा होणार असून, जयंतीदिनी स्वदेशी संकल्प यात्रा निघणार आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचेही औचित्य या कार्यक्रमांसाठी साधण्यात आले आहे.

गांधीजी आणि संघावरून राजकीय वाद काय आहे?

गांधीजींच्या हत्येशी संघाचा संबंध जोडणारे आरोप काँग्रेसकडून होत आले आहेत. राहुल गांधी यांनी ६ मार्च २०१४ रोजी भिवंडीतील प्रचारसभेत ‘संघाच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली’, असा आरोप केला होता. त्याविरोधात संघ कार्यकर्त्याने बदनामीची तक्रार दाखल केली. मात्र, २०१६ मध्ये राहुल यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण संघ या संस्थेला दोष दिलेला नसून, संबंधित व्यक्तींविषयी विधान असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील कार्यक्रमांत गांधीजींच्या स्वदेशी विचारांचा विषय केंद्रस्थानी असणार आहे.

जयंतीच्या पूर्वसंध्येला कोणती सभा होणार?

गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्वदेशीविषयक सभा होईल. धरमपेठ एक्स्टेंशनमधील शिवाजीनगर येथील बाजीप्रभू देशपांडे चौकातील डॉ. हेडगेवार भवन परिसरात, डॉ. हेडगेवार ब्लड बँक येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ॲड. उल्हास औरंगाबादकर अध्यक्षस्थानी असतील.

गांधीजी, संघ आणि संविधानावर कोण बोलणार?

डॉ. श्रद्धा भारद्वाज ‘स्वदेशी आणि गांधीजी’, सुनील कितकरू ‘स्वदेशी आणि संघ’, धनंजय भिडे ‘चला जागरण करूया स्वदेशीचे’, तर ॲड. अविनाश काळे ‘संविधान आणि स्वदेशी’ या विषयांवर मार्गदर्शन करतील. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महापालिकेच्या धरमपेठ झोन क्रमांक दोनच्या सभापती धनश्री देशपांडे यांनी पत्रिकेद्वारे केले आहे.

शुक्रवारच्या यात्रेचा मार्ग कोणता?

शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शंकरनगर चौकातून स्वदेशी संकल्प यात्रा सुरू होईल. लक्ष्मीभवन चौकमार्गे यात्रा रामनगरमधील श्री बाजीप्रभू चौकात पोहोचेल. त्यानंतर धरमपेठ महिला सोसायटीच्या सीताराम भवनात सभेने सांगता होईल. विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि नागरिक यात्रेत सहभागी होणार आहेत.

यात्रेत प्रमुख उपस्थिती कोणाची असेल?

महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पद्मश्री डॉ. विकास महात्मे अध्यक्षस्थानी असतील. समितीचे उपाध्यक्ष आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर तसेच वासंती भागवत प्रमुख अतिथी असतील. तर पत्रिकेद्वारे नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन धनश्री देशपांडे, समितीचे सचिव संजय बांगले, मार्गदर्शक ॲड. अविनाश काळे, कांचनताई गडकरी, नीलिमाताई बावणे आणि इतरांनी केले आहे.