वर्धा : दुर्बल घटकातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ साली लागू झाला. त्या अंतर्गत खाजगी शाळात या घटकास २५ टक्के जागा आरक्षित करण्यात आला. त्या संदर्भात ही घडामोड आहे. नियम व वयाची अट अशी राहणार. नव्याने प्रवेश होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे.
प्रवेश प्रक्रिया सूरू
महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील बालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम (RTE) २००९ अंतर्गत, राज्यातील खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, संपूर्ण राज्यात ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून राबविली जाणार आहे.
ही’ कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य
या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी पालकांना १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली होती. अर्ज करताना ‘ही’ कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. RTE ऑनलाईन अर्ज भरताना पालकांना खालील महत्त्वाची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत:
- बालकाचा जन्माचा दाखला आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा.
- भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाची नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत आवश्यक राहील.
- सामाजिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आणि अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र येथे ग्राह्य धरले जाणार नाही).
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकांचा वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे.
गुगल मॅप आणि शाळा निवडीचे नियम
पालकांना अर्ज करताना आपल्या पाल्यासाठी जास्तीत जास्त १० शाळांचे पर्याय निवडण्याची मुभा असेल. ऑनलाईन पोर्टलवर पालकांच्या निवासस्थानापासून १ किमी आणि त्याआतील अंतरावर असलेल्या शाळा दर्शविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पालकांना त्यांचे राहते घर गुगल मॅप (GPS) मध्ये दर्शवताना ‘बलून लँडमार्क’च्या १ किमीच्या मर्यादेत दाखवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेशासाठी वयाची नवीन अट
शासन निर्णयानुसार, ३१ डिसेंबरच्या मानीव दिनांकानुसार बालकांचे किमान वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे:
- प्ले ग्रुप/नर्सरी (इयत्ता पहिलीपूर्वीचा ३ रा वर्ग): किमान वय ३ वर्षांपेक्षा जास्त (३+).
- इयत्ता पहिली: किमान वय ६ वर्षांपेक्षा जास्त (६+).
मुख्याध्यापकांना विशेष अधिकार
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, याची प्रत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांना माहितीसाठी सादर करण्यात आली आहे. पात्र पालकांनी दिलेल्या मुदतीत सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन आहे.
