भंडारा : माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) ग्रामपंचायतीच्या कामांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या युवकाच्या सहकाऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यमान पंचायत समिती सदस्य आणि महिला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसरीकडे महिला सरपंचानेही पाच जणांविरुद्ध मारहाणीची उलट तक्रार दिल्याने प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना ४ ऑगस्ट रोजी विरली (खुर्द) ग्रामपंचायत कार्यालयात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरली (खुर्द) येथील पांडुरंग ठाकरे (३१) यांनी ग्रामपंचायतीतील विविध कामांची माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. त्यानुसार ग्रामसेवकाने त्यांना संबंधित कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात बोलावले होते. यावेळी त्यांच्यासोबत तुषार दयाराम भागडकर (२६) हेही उपस्थित होते.

माहिती देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी (४२) आणि महिला सरपंच शारदा जितेंद्र पारधी (३५) यांनी तुषार भागडकर यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. मात्र, याच घटनेनंतर महिला सरपंच शारदा पारधी यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली. सरपंच कक्षात असताना पाच जणांनी आत घुसून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून हरिश्चंद्र भागडकर (४५), जनार्दन भागडकर (३९), अश्विन भागडकर (२३), अक्षय भागडकर (२१) आणि तुषार भागडकर (२५) यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणामुळे आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या २००७ मधील निर्देशांनुसार महिला सरपंचांच्या पतींनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींमध्ये या नियमाचे उल्लंघन होत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. विरली (खुर्द) येथील घटनेनंतरही या नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी होत आहे.
दरम्यान, दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी तक्रारींमुळे नेमके सत्य काय, याचा तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासानंतरच या वादाचे वास्तव स्पष्ट होणार आहे.