जुन्या वाहन खरेदीनंतरची नोंदणी आता घरबसल्या ! ; नागरिकांची ‘आरटीओ’तील पायपीट थांबणार

राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांत २०१८ मध्ये २७ लाख १४ हजार ३५७ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती.

परिवहन खात्याकडून ‘एनआयसी’ला सूचना

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : वाहन चालवण्याच्या शिकाऊ परवान्याच्या धर्तीवर आता जुन्या दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीनंतरची नोंदणीही नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे. परिवहन खात्याने या सुविधेसाठी संकेतस्थळावर आवश्यक बदल करण्याची सूचना हे काम हाताळणाऱ्या राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) या संस्थेला केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची राज्यातील विविध आरटीओ कार्यालयातील पायपीट थांबणार आहे. आरटीओ कार्यालयातील दलाल संस्कृती संपवण्याचा हा प्रयत्न आहे.

राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांत २०१८ मध्ये २७ लाख १४ हजार ३५७ नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. ही संख्या २०२० या करोना काळात कमी होऊन १७ लाख ७५ हजार ७३६ एवढी झाली. तर २०२१ मध्ये २० ऑक्टोबपर्यंत राज्यांत १४ लाख २५ हजार २६३ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. या वाहनांच्या नोंदणीसाठी पूर्वी संबंधित वाहन विक्रेत्यांना संबंधित आरटीओ कार्यालयांत जावे लागत  होते. सोबत वाहनांचे निरीक्षण मोटर वाहन निरीक्षकांकडून करावे लागत होते. परंतु आता ही नोंदणी थेट संबंधित शोरूममध्येच करण्याची मुभा परिवहन खात्याने दिली असून निरीक्षणही बंद केले गेले आहे. त्यानंतर आता नवीन वाहनांहून दुप्पटीहून अधिक विक्री होणाऱ्या जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणीही घरबसल्या होणार आहे.

या प्रक्रियेसाठी परिवहन खात्याने परिवहन खात्याच्या संकेतस्थळाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एनआयसी या संस्थेला सूचना केली आहे. सूचनेनुसार वाहनाची विक्री करणाऱ्याला त्याच्या आधार क्रमांकासह वाहनाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. त्यात हे वाहन खरेदी करणाऱ्याचीही काही माहिती टाकावी लागेल. त्यानंतर खरेदी करणाऱ्याने त्याला आलेल्या लिंकवर स्वीकार केल्याचे क्लिक केल्यास हे वाहन त्याच्या नावावर होईल. त्यापूर्वी संबंधिताला या वाहनाच्या नोंदणीवरील नाव बदलण्याचे (पान ९ वर)

पारदर्शी कामाचा प्रयत्न

‘‘शिकाऊ वाहन परवान्याच्या धर्तीवर आता जुन्या वाहन खरेदीनंतरची नोंदणीही नागरिकांना घरबसल्या करता येईल. त्यासाठी ‘एनआयसी’ला संकेतस्थळावर आवश्यक दुरुस्तीची सूचना केली आहे. या बदलानंतर वाहन खरेदी-विक्री करणाऱ्याने आवश्यक माहिती संकेतस्थळावर अपलोड केल्यास हे वाहन संबंधिताच्या नावावर होईल. या पारदर्शी कामासाठी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद आहे.’’

– डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.

जुनी ‘आरसी’ रद्द  होणार

घरबसल्या जुन्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यास जुन्या मालकाकडे या वाहनाची एक आरसी (नोंदणी प्रमाणपत्र) आणि नवीन मालकाकडे संबंधित आरटीओ कार्यालयातून नवीन दुसरी आरसी जाणार आहे. परंतु हा पेच सोडवण्यासाठी परिवहन खात्याकडून जुनी आरसी स्वयंचलित पद्धतीने रद्द केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर हे वाहन चांगले असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारीही या प्रक्रियेत ती खरेदी करणाऱ्याला  पार पाडावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rto to start soon online re registration for old vehicle purchase zws

ताज्या बातम्या