नागपूर : परिवहन खात्यातील आरटीओ पदावरील पदोन्नती आणि पदस्थापनेत स्पर्धक असलेल्या रवींद्र भुयार यांच्यावर कट रचून खोट्या गुन्ह्यात अडकवणार्‍या नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण आणि इतर सहा जणांवर नागपूरातील सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार हे नागपूर शहर आरटीओ कार्यालयात कार्यरत होते. त्यांना हटवण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी एकत्र येत कट रचला. त्यानुसार भुयार यांच्या विरोधात एका महिला अधिकार्‍यास चुकीची माहिती देऊन भुयार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले.

नागपूरच्या पदस्थापनेला विरोध नको म्हणून भुयारांना अडचणीत आणण्यासाठी विजय चव्हाण यांनी सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण खाडे याची मदत घेऊन आरटीओ नागपूरचा अतिरिक्त कार्यभार मिळवला होता. दुसरीकडे परिवहन विभागात अधिकार्‍यांच्या बदल्या संदर्भात गैरकारभाराची चौकशी पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी विशेष एसआयटीद्वारे केली. त्यात लक्ष्मण खाडे, विजय चव्हाण व इतर अधिकार्‍यांच्या समावेशाबाबत शासनास पुरावे सादर झाले.

दरम्यान रविंद्र भुयार यांचा काटा काढण्यासाठी व त्यांना नागपूर येथे पदस्थापना मिळू नये म्हणून विजय चव्हाण, लक्ष्मण खाडे यांनी एका महिला अधिकार्‍यास गैरसमज निर्माण होईल अशी चुकीची बातमी देऊन रविंद्र भुयार यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करायला प्रवृत्त केले. या प्रकरणी पोलीसांना हा गुन्हा खोटा असल्याचे आढळले. त्यामुळे न्यायालयात ब- वर्ग समरी दाखल झाल्याने न्यायालयाने पोलीसांचा अहवाल अंतिम केला.

तर जानेवारी २०२३ मध्ये महिला अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. हिमांगीनी पाटील या चव्हाण यांच्या बॅचमेट होत्या. त्यामुळे पाटील यांनी विजय चव्हाणांना लाभ व्हावा म्हणून समितीमधील दीपक पाटील यांच्यासोबत खोटा रिपोर्ट तयार केला. हा सर्व गैरप्रकार समितीमधील अशासकीय सदस्या अनिता दार्वेकर यांनी उघडकीस आणल्यामुळे समितीचे बेकायदेशीर वर्तन समोर आले.

या संदर्भात न्यायालयात दाखल विविध प्रकरणात पारित झालेल्या आदेशाप्रमाणे रवींद्र भुयार यांच्या फिर्यादीवरून व सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे विजय चव्हाण, दीपक पाटील, लक्ष्मण खाडे, हेमांगीनी पाटील आणखी एक अशा पाच जणांवर दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांकडून अद्याप माहिती नाही – विजय चव्हाण

पोलीसांनी आमच्यावर तक्रार वा गुन्ह्या दाखल केल्याबाबत माहिती नाही. मध्यंतरी एकाने परिवहन आयुक्त व एका अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली होती. त्यांच्याकडून या पद्धतीची तक्रार झाल्याचे नकारता येत नाही. त्यांनी शासनाच्या समितीलाही खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही कोणतेही गैरप्रकार केला नसून वेळ आल्यास आमची बाजू मांडू, अशी माहिती नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.