दिवाळीच्या सणासुदीत रेल्वे, एसटी, खासगी बसने प्रवासी प्रवास करतात. शासनाने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटीच्या प्रवासी भाडे दराच्या ५० टक्क्यांहून जास्त भाडे राहणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही काही ट्रॅव्हल्स मनमानी भाडे घेऊन ग्राहकांची लूट करतात. आता आरटीओ कार्यालयाने सगळ्या ट्रॅव्हल्सना दर्शनी भागात दरपत्र लावण्याच्या सूचना करत ग्राहकांची लूट करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

नागपुरातून रोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, शासकीय व खासगी अस्थापनातील कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक विविध कामानिमित्त खासगी ट्रॅव्हल्सने पुणे, नाशिक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणासह इतरही शहर, राज्यांत जात असतात. दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी बघता ट्रॅव्हल्सकडून अचानक भरमसाठ भाडेवाढ केली जाते. शासनाने ही दरवाढ एसटी महामंडळाच्या भाड्याहून ५० टक्केहून जास्त नसावी, असा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही बऱ्याच ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून या आदेशाचे पालन होत नाही.

हेही वाचा : नागपूर: अजित पारसेला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, वारंवार आत्महत्या करण्याचे नाटक

दरम्यान, आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी आल्यावर अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जाते. परंतु, कुणी तक्रारीलाही पुढे येत नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी पुढाकार घेत सगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना त्यांच्या बसेस सुटणाऱ्या भागातील दर्शनीय भागात तिकिटांचे दरपत्रक लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा : नागपूर : ‘आनंदाचा शिधा’ : कुठे वाटप कुठे प्रतीक्षा, शिधापत्रिकाधारकांच्या पदरी निराशा

शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयांची अधूनमधून आरटीओकडून झडतीही घेतली जाणार आहे. त्यात ग्राहकांची लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा रवींद्र भुयार यांनी दिला. तर नागरिकांनीही पुढे येऊन dycommr.enf2@gmail.com या संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. दोषींवर निश्चित कडक कारवाई केली जाणार असल्याचेही भुयार यांनी सांगितले.