नागपूर : ‘एमकेसीएल’च्या दबावात येत काही दिवसांपासून ऑनलाईन परीक्षेचा कित्ता गिरवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निर्णयाचा असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिटय़ूटने प्रखर विरोध केला आहे. ऑनलाईन परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ असून नागपूर विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईनच घ्याव्या, अशी मागणी केली आहे.

प्रेस क्लबमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिटय़ूटचे उपाध्यक्ष सूरज अय्यर यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही यावर निर्णय जाहीर केलेला नाही. विद्यापीठातील काही अधिकारी ऑफलाईन परीक्षांवर सकारात्मक आहेत. परंतु, काही विद्यार्थी संघटना आंदोलन करून ऑनलाईन परीक्षेची मागणी करीत आहेत. अशा आंदोलनांना विद्यापीठ बळी पडण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षा आज जरी विद्यार्थ्यांना सोप्या वाटत असल्या तरी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या आहेत.

ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अनेक जागतिक दर्जाच्या खासगी कंपनी नोकरी नाकारात आहेत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालू नये, अशी मागणीही असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिटय़ूटने केली आहे. या पत्रपरिषदेला उपाध्यक्ष सूरज अय्यर, डॉ. समीर फाले, जगदीश अग्रवाल, राहुल राय उपस्थित होते.

आक्षेप काय?

  •   ऑनलाईनमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान नाही.
  •   दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन असताना पदवी, पदव्युत्तरला ऑनलाईन परीक्षा का?
  •   सर्व शाळांनी ऑफलाईन परीक्षा घेतली असताना विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन का?