लोकसत्ता टीम
नागपूर : वाडी परिसरात बॉम्ब सदृष्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. एका विद्यार्थ्याच्या ‘शूज’च्या डब्यात ती बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा ताफा वाडी परिसराकडे पोहचला. बॉम्ब शोधक व नाशक पथकही पोहचले. त्यांनी ती बॉम्ब सदृष्य वस्तू ताब्यात घेतली. त्यानंतर त्या वस्तूची तपासणी केली असता तो विद्यार्थ्याचे ईलेक्ट्रॉनिक्स प्रात्याक्षिकाचे साहित्य असल्याचे समोर आले. मात्र, तोपर्यंत बॉम्बच्या अफवेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
शहर पोलीस नियंत्रण कक्षात धनिराम नाईक (रा. वाडी) नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. तो धापा टाकतच बोलला. ‘साहेब माझ्या घरात बॉम्ब आहे. तो बॉम्ब माझ्या मुलाच्या बुटात लपवून ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये लाईटसुद्धा लागत आहे. पटकन मदत पाठवा.’ अशी माहिती दिली. बॉम्बची माहिती असल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाने लगेच बॉम्ब शोधक-नाशक पथकाला माहिती दिली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि त्यांचा मोठा ताफा वाडीत धनिराम नाईक यांच्या घरी पोहचला. त्यांनी तो परिसर रिकामा केला. आजुबाजूच्या लोकांना बॉम्ब सदृष्य वस्तू धनिरामच्या घरात असल्याची माहिती मिळातच वस्तीत धावपळ झाली. लोकांनी पटापट वस्ती रिकामी केली. अबाल-वृद्ध घराबाहेर पडले आणि बऱ्याच अंतरावर बसले.
आणखी वाचा-दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…
बॉम्बशोधक-नाशक पथकाची तासभर कसरत
शहर पोलीस दलाचे बॉम्बशोधक-नाशक पथक घटनास्थळी पोहचले. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वस्तीला सुरक्षेचा वेढा घातला. पथक धनिराम यांच्या घरी पोहचले. त्यांनी जवळपास तासभर परिश्रम घेत त्या ‘शूज’च्या जवळ पोहचले. त्यांना बॉम्ब सदृष्य वस्तू दिसली. त्यांनी तांत्रिक पद्धतीचा वापर करीत ती वस्तू ताब्यात घेतली. ती वस्तू सुरक्षित स्थळी पोहचवली. तेथे ‘बॉम्ब डिफ्यूज’ करण्याची प्रक्रिया सुरु केली. काही वेळातच ती वस्तू बॉम्ब नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आणखी वाचा-नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक
बॉम्ब सदृष्य वस्तू म्हणजे ‘सायन्स प्रोजेक्ट’
धनिराम नाईक यांचा मुलगा दहावीत आहे. सध्या त्याचे विज्ञान विषयाचे प्रात्याक्षिक सुरु आहे. त्याला प्रात्याक्षिक म्हणून ‘शूजमध्ये दाब टाकल्यानंतर लाईट कसा लागतो’ हा ‘सायन्स प्रोजेक्ट’ करायचा होता. त्याने बाजारातून ते सर्व साहित्य आणले आणि त्याने तो प्रयोग केला. शाळेतून आल्यानंतर त्याने तो प्रोजेक्ट शूजमध्ये ठेवला. दरम्यान, वडिल धनिराम यांची नजर शूजवर गेली. त्यांना बॉम्ब असल्याचे वाटले. त्यामुळे त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, अशी माहिती समोर आली.