नागपूर : “महिला आयोगाकडे अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत की ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत. पण, त्यांच्यावर सरकारकडून कुठलीही कारवाई होत नाही. जशी कारवाई विरोधी पक्षातील नेत्यांवर केली जाते तशी भाजपाच्या नेत्यासंदर्भातही झाली पाहिजे”, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने रुपाली चाकणकर नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. कायदा हा सर्वांसाठी सारखा असताना तो राज्यात आणि केंद्रात सर्व पक्षांसाठी सारखा नाही. राहुल गांधी यांचे प्रकरण पाहता, देश हुकुमशाहीकडे जात आहे का, अशी शंका येते. सर्व विरोधी पक्षांकडून राहुल गांधी यांना पाठिंबा मिळत असल्याचे चाकरणकर म्हणाल्या.
हेही वाचा – भंडारा: देव तारी त्याला कोण मारी… रेल्वेत चढताना प्रवाशाचा तोल गेला, अन्…
ठाकरे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात तक्रार आली, तेव्हा राज्य महिला आयोगाने सहा पत्रे पाठवली. आम्हाला अपेक्षा होती कारवाई होईल. मात्र, तसे झाले नाही, जशी कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर केली जाते तशी भाजपाच्या नेत्यांसंदर्भातही झाली पाहिजे, असेही चाकणकर म्हणाल्या.
हेही वाचा – वर्धा: देशभरातील अडीच हजारावर रेल्वे थांबे बंद; रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
महिला संदर्भातल्या गंभीर प्रकरणात राज्य महिला आयोग स्वतःहून दखल घेते किंवा ज्या महिला आयोगापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा महिलांच्या संदर्भात स्वतःहून दखल घेते. मात्र अमृता फडणवीस किंवा अनिक्षा जयसिंघानी यांच्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे कुठलीच तक्रार आली नाही. त्यामुळे आम्ही दखल घेण्याचे कारण नाही. आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही नक्कीच त्याची दखल घेऊ. सत्य परिस्थिती पोलिसांच्या तपासातून बाहेर आली पाहिजे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.